Pandharpur News: माघी सोहळ्यासाठी आलेल्या 137 वारकऱ्यांना भगरीतून विषबाधा; अन्न आणि औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड
Pandharpur News : जवळपास 137 वारकऱ्यांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने रात्री उशिरा या सर्व वारकऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले
पंढरपूर: माघी एकादशी (Maghi Ekadashi) सोहळ्यासाठी आलेल्या मराठवाड्यातील 137 भाविकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. भाविकांना उप[जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड पडल्याने याचा फटका वारकऱ्यांना बसला आहे.
माघी सोहळ्यासाठी नांदेड, परभणी भागातील हदगाव येथून निघालेली मराठा पायी दिंडी सोहळ्यात 175 भाविक सहभागी झाले होते. हे भाविक 31 जानेवारी रोजी येथील निळोबाराय मठात उतरले होते. काल माघी एकादशीचा सोहळा असल्याने सर्वच वारकऱ्यांचा उपवास होता. त्यामुळे येथील कौस्तुभ ट्रेडिंग कंपनी या दुकानातून या वारकऱ्यांनी भगर आणून शिजवून फराळ केला. यानंतर दिवसभर भजन सुरू झाल्यावर यातील जवळपास 137 वारकऱ्यांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने रात्री उशिरा या सर्व वारकऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले.
137 वारकऱ्यांपैकी 48 वारकऱ्यांना त्रास कमी असल्याने त्यांना औषधे देऊन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने या दुकानातील भगर आणि इतर पदार्थांचे सॅम्पल अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली असून तपासणीसाठी पाठवून देण्यात आली आहेत. या घटनेनंतर सोलापूरचे सिव्हिल सर्जन डॉ. धनंजय पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन वारकऱ्यांची तपासणी केली. सर्व वारकरी धोक्याच्या बाहेर आले असले तरी देवाच्या दर्शनाला आलेल्या वारकऱ्यांना हलक्या प्रतीचे उपवासाचे पदार्थ दिल्याने त्यांना विषबाधेचा सामोरे जावे लागले .
वास्तविक प्रत्येक यात्रेपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने शहरात येऊन शहरातील दुकानांमधील सामानाची तपासणी करणे आवश्यक आहे. धोकादायक पद्धतीने अन्न पदार्थांची विक्री सुरू असताना हे अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत. यात्रा तयारी बैठकीत प्रत्येकवेळी जिल्हा प्रशासन अन्न आणि औषध प्रशासनाला सूचना देऊनही या विभागाचा गहाळ कारभार वारकऱ्यांच्या जीवावर उठत आहे. घटना घडल्यावर तातडीने नमुने गोळा करण्याचे काम करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाने नियमानुसार, यात्रेपूर्वी ही तपासणी केली असती तर वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ झाला नसता.
घटना घडल्यानंतर सहायक आयुक्त सुनील कुचेकर यांनी आपल्या विभागाने 37 दुकानाची यात्रेपूर्वी तपासणी केल्याचे उत्तर दिले. आता या दुकानातून जवळपास 32 हजार रुपयांचे साहित्य अन्न आणि औषध विभागाने जप्त करून तपासणीला पाठवून दिले आहेत. मात्र वारंवार भगर खाल्ल्याने असे प्रकार घडत असताना आता शासनानेच याबाबत गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी करत आहेत. वारीसोबत आलेल्या वारकऱ्यांना पंढरपूर शहरातील किराणा दुकानाबाबत कोणतीच माहिती नसते. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने यात्रेपूर्वी अशा तपासण्या केल्या तरी विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या भाविकांना रुग्णालयत दाखल होण्याची वेळ येणार नाही. या प्रकारणात दोषी असणाऱ्या सर्वांवर शासनाने कडक कारवाई करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे.