एकीकडे लोकसभेची धामधूम, दुसरीकडे दुष्काळाची टांगती तलवार; उजनी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर, दररोज कोट्यवधी लिटर पाण्याचं बाष्पीभवन
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसऱ्याबाजूनं दुष्काळाच्या नियोजनाचा दुहेरी ताण प्रशासनावर आला आहे.
Maharashtra News Updates : सोलापूर : सोलापूरसह (Solapur News) नगर, उस्मानाबाद (Osmanabad News) जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात (Ujani Dam) आज केवळ वजा 36 टक्के पाणीसाठा आहे. यंदाची उजनी धरणाची परिस्थिती पाहता उजनी यावेळी इतिहासातील नीचांकी पातळी गाठण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या धरणाच्या जलाशयातील पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाचवण्यासाठी ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून चाऱ्या काढण्यात आल्या आहेत. या चाऱ्यामधून पाईपलाईन टाकून मोटारी सुरू ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरू असताना दुसऱ्याबाजूनं दुष्काळाच्या नियोजनाचा दुहेरी ताण प्रशासनावर आला आहे. आज उजनी धरणात केवळ वजा 36 टक्के पाणीसाठा असून अजून चार ते पाच दिवसांत पाणीपातळी वजा 40 टक्क्यावर पोचल्यावर जलाशयावरील पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक योजना बंद पडण्यास सुरुवात होणार आहे. सोलापूर शहरासाठी सोडलेलं पाणी सोलापूरसाठी पोचल्यानं किमान 50 दिवस तरी सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तरीही या सर्व शहरांत सध्या एक दिवसाआड पाणी देऊन पाण्याचा काटकसरीनं वापर केला जात आहे. मात्र पुन्हा ऐन उन्हाळ्यात म्हणजेच, 15 मेच्या दरम्यान उजनी धरणातून पाणी सोडावं लागणार आहे. यानंतर उजनी धरणाची अवस्था खूपच बिकट बनणार असून उजनी धरणाच्या इतिहासातील नीचांकी पातळी गाठणार आहे.
नऊ वर्षांपूर्वी म्हणजे 2015 साली उजनी धरणानं वजा 60 टक्के इतकी नीचांकी पातळी गाठली होती. यावर्षी वजा 70 टक्क्यांपर्यंत पातळी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातच उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यानं आणि जलाशयावर सुरु असलेल्या पाणी उपशामुळे पाणी पातळी झपाट्यानं खालावू लागली आहे. धरणातील पाण्याचं रोज होणारं बाष्पीभवन आणि शेतीसाठी उपसा यामुळे रोज 0.15 टीएमसी म्हणजे साधारण 425 कोटी लिटर पाणी कमी होत आहे. यातच 15 मेपर्यंत पाणी पातळी वजा 60 टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. पुन्हा सोलापूर शहरासाठी 6 टीएमसी पाणी सोडल्यानंतर उजनी धरण इतिहासातील नीचांकी पातळीला पोचणार आहे.
यामुळेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भीषण दुष्काळी स्थिती टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. सध्या उजनीतून सोडले जात असणाऱ्या पाण्याने तलाव, बंधारे भरून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाण्याचा शेतीसाठी वापर होऊ नये यासाठी डिझेल पंप, सोलर पंप सील केले गेले आहेत. एवढे सर्व नियोजन केले असले तरी मे आणि जूनमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाळा उशिरा येण्याची शक्यता आहे. यामुळे ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची धडपड प्रशासन करीत आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीत प्रशासन अडकल्याने निवडणूक आणि दुष्काळी स्थिती या दोन्हीवर एकाचवेळी काम करण्याचा ताण प्रशासनावर पडला आहे . यंदा पाण्याचे नियोजन कोलमडल्याने ही भीषण स्थिती आल्याचे आरोप वारंवार केले जाऊ लागले आहेत.