Maharashtra Assembly Elections 2024 : बार्शीत पुन्हा पारंपारिक लढत, दिलीप सोपल नवव्यांदा रिंगणात, आजवर सात चिन्हं बदलली, तर राजेंद्र राऊतांनी..
Barshi Assembly Constituency : पक्ष आणि चिन्ह कुठलेही असले तरी बार्शी विधानसभा मतदारसंघाचीनिवडणूक ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्धीमध्येच आपल्याला पाहायला मिळते.
सोलापूर : पक्ष आणि चिन्ह कुठलेही असले तरी बार्शी विधानसभा मतदारसंघाची (Barshi Assembly Constituency) निवडणूक ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्धीमध्येच आपल्याला पाहायला मिळते. 1999 पासून दिलीप सोपल (Dilip Sopal) आणि राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यातच बार्शी विधानसभा मतदार संघात लढाई पाहायला मिळाली. यंदाची विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2024) देखील त्याला अपवाद नाहीये. यंदा मात्र बार्शी विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. माजी मंत्री दिलीप सोपल हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून (Shiv sena Shinde Group) राजेंद्र राऊत बार्शीच्या मैदानात आहेत.
माजी मंत्री दिलीप सोपल हे तब्बल 9 वेळेस बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 1985 साली त्यांनी आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास सलग 9 विधानसभा निवडणूकमध्ये उमेदवार राहिलेत. मात्र, या 9 निवडणुकीत तब्बल 7 वेळा त्यांनी आपले चिन्ह बदलले आहेत. घड्याळ चिन्ह वगळता कोणत्याही चिन्हावर त्यांनी एकापेक्षा अधिक वेळा निवडणूक लढवलेली नाही.
दिलीप सोपल यांचा 8 पैकी तब्बल 6 निवडणुकीत विजय
1985 साली दिलीप सोपल यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे चिन्ह हे चरखा होते. 1990 साली त्यांनी काँग्रेसच्या हातावर निवडणूक लढवली. 1995 साली अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचे चिन्ह सायकल होते. 1999 साली त्यांनी शरद पवारांची साथ धरली. घड्याळ्याचा चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. 2004 साली झालेल्या निवडणुकीत ही त्यांचे चिन्ह घड्याळ कायम राहिले. 2009 साली मात्र त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी कपबशी चिन्ह त्यांना मिळाले होते. 2014 साली पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवली त्यामुळे घड्याळ चिन्ह तिसऱ्यांदा मिळाले. 2019 साली दिलीप सोपल यांनी राजकीय जीवनातील सर्वात मोठा निर्णय घेतला. अनेक वर्षपासून असलेली शरद पवारांची साथ सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2019 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हवर निवडणूक लढवली. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे चिन्ह मशाल असणार आहे. दिलीप सोपल यांनी लढवलेल्या 8 पैकी तब्बल 6 निवडणुकीत त्यांच्या विजय झालाय. 2004 आणि 2019 मध्ये मात्र दोन वेळेस त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
राजेंद्र राऊत सहाव्यांचा मैदानात, चौथ्यांदा ‘धनुष्यबाणा‘वर लढणार
दिलीप सोपल यांच्या विजयाची घोडदौड राजेंद्र राऊत यांनी रोखली. 1999 साली राजेंद्र राऊत यांनी बार्शी विधानसभेत पहिल्यांदाच दिलीप सोपल यांच्या पुढे आव्हान उभे केले. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 6 व्यंदा दिलीप सोपल यांच्याशी राजेंद्र राऊत यांची लढत बार्शीत पाहायला मिळतेय. या 6 पैकी राजेंद्र राऊत चौथ्यांदा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. तर एकदा काँग्रेस आणि अपक्ष म्हणून ही त्यांनी निवडणूक लढवली. 5 पैकी दोन निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना विजयश्री देखील प्राप्त झाले. 1999 साली राजेंद्र राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत उतरताना शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्ह घेतलं होते. त्यानंतर 2004 साली ते धनुष्यबाण चिन्हावरच मैदानात होते. या निवडणुकीत त्यांच्या विजय झालेला होता. मात्र 2009 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2009 ची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या हातावर लढवली. 2014 मध्ये पुन्हा घरवापसी करत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं. 2019 मध्ये दिलेली सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राऊत अपक्ष बार्शीच्या मैदानात उतरले. ट्रॅक्टर चिन्हवर निवडणूक लढवत विजय ही प्राप्त केला. यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपमध्ये बार्शीची जागा ही शिवसेनाच्या वाट्याला गेल्याने राऊत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यंदाची निवडणूक ते पुन्हा एकदा धनुष्यबाण चिन्हवर लढवत आहेत.
आणखी वाचा