अजितदादांनी आर. आर. आबांविषयीची वक्तव्य करुन आफत ओढावून घेतली? सिंचन घोटाळाप्रकरणी लढा देणाऱ्या संघटनेची सूचक प्रतिक्रिया
Janmanch on Ajit Pawar : आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची परवानगी देऊन केसाने गळा कापला, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.
मुंबई : आर. आर. पाटील (R R Patil) यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची परवानगी देऊन केसाने गळा कापला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सिंचन घोटाळा प्रकरणी गेली अनेक वर्ष न्यायालयीन लढा लढणाऱ्या जनमंच (Janmanch) या संघटनेनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तत्कालीन गृहमंत्र्यांना सिंचन घोटाळा प्रकरणी काही आढळलं असेल म्हणूनच परवानगी दिली असावी, असं या संघटनेने म्हटलं आहे.
आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळा प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री म्हणून खुल्या चौकशीची परवानगी का दिली याचं स्पष्टीकरण द्यायला आज जरी आर. आर. पाटील स्वतः हयात नसले, तरी आम्हाला वाटतं की, निश्चितच त्यांना तेव्हा त्या प्रकरणात काही आढळलं असेल, म्हणूनच त्यांनी खुल्या चौकशीच्या परवानगीच्या फायलीवर स्वाक्षरी केली असावी, असं मत जनमंच या संघटनेने व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे राज्यात सिंचन घोटाळा प्रकरणी आवाज उठवणाऱ्या आणि त्यानंतर त्या संदर्भात न्यायालयीन लढा देणाऱ्या संघटनांपैकी जनमंच ही एक प्रमुख संघटना आहे.
सिंचन घोटाळा संदर्भात बरेचशे पुरावे होते
नुकतच तासगावच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यासंदर्भात एबीपी माझाने जनमंच या संघटनेची प्रतिक्रिया जाणून घेतली. जनमंचचे विद्यमान अध्यक्ष राजीव जगताप (Rajiv Jagtap) म्हणाले की, त्यावेळेस आर. आर. पाटलांनी असा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण आज ते स्वतः देऊ शकले नसले. तरी सिंचन घोटाळा संदर्भात बरेचशे पुरावे होते, तेव्हा ते न्यायालयासमोरही मांडले गेले होते. कदाचित त्याच पुराव्यांच्या आधारे आर. आर. पाटील यांनी खुल्या चौकशीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज आज काढता येऊ शकतो, असे राजीव जगताप म्हणाले.
विदर्भाच्या शेतकऱ्यांना एक दिवस नक्कीच न्याय मिळेल
आर. आर. पाटील यांना त्या फाईलमध्ये खरंच तथ्य आढळले होते आणि त्या आधारावर त्यांनी खुल्या चौकशीला परवानगी दिली होती की त्यांना खरंच राजकीयदृष्ट्या कोणाचा गळा केसाने कापायचा होता याबद्दल आम्ही भाष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आजही जनमंचची याचिका उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असून लवकरच ती न्यायालयात सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. आम्ही आधीच सिंचन घोटाळ्यासंदर्भातील सर्व तपशील न्यायालयासमोर मांडले असून त्याद्वारे विदर्भाच्या शेतकऱ्यांना एक दिवस नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वासही जनमंचने व्यक्त केला आहे.
आणखी वाचा