Madha : मोहिते पाटील- निंबाळकर वाद मिटलाच नाही, माढ्यातील बावनकुळेंची शिष्टाई फेल; भाजपमधील गटबाजीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीची नजर
Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्यामध्ये सध्या वाद सुरू असून त्याचा फटका भाजपला बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेल्या भाजपाची चिंता माढा लोकसभा मतदारसंघातील राजकारणाने (Madha Lok Sabha Election) वाढवल्याचं चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना दोन दिवसांच्या दौऱ्यात मोहिते पाटील (Vijaysingh Mohite Patil) आणि खासदार निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांच्यातील वाद मिटवण्यात अपयश आल्याचं दिसतंय. त्यामुळे माढ्याचा तिढा संपून भाजपचा विजय सुखकर होतोय की राष्ट्रवादी त्याचा फायदा घेऊन कमबॅक करतंय हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
माढा मतदारसंघाच्या दौऱ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोहिते पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्यातील वाद सोडवण्याची जबाबदारी होती. बावनकुळे यांच्या फलटणपासून दौऱ्याला सुरुवात झाल्यावर निंबाळकर यांनी आपली ताकद दाखवून देण्यास सुरुवात केली. फलटण दौरा आटपून बावनकुळे यांचा ताफा जेव्हा सायंकाळी माळशिरस येथे आला त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांचा विश्रामगृहावर सत्कार केला. माळशिरस तालुका म्हणजे मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला. मात्र येथेही सत्काराला बावनकुळे यांच्यासोबत खासदार रणजित निंबाळकर असल्याने यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र बाहेर गाडीत बसून असल्याचे दिसून आले.
निंबाळकरांच्या उमेदवारीला हिरवा कंदील
माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी लोकसभेचे तिकीट मागण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे सांगत मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात मतभेद आहेत, मात्र मनभेद नसल्याचा दावा केला. काही दिवसापूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या जागेवर दावा सांगणार असे जाहीर केल्यानंतर माळशिरसमध्ये भावी खासदार म्हणून त्यांचे बोर्ड लागले होते. त्यानंतर कोणी बोर्ड लावल्याने काही होणार नाही, ज्याला तिकीट मिळेल त्याचा प्रचार दुसऱ्याला करावा लागेल असा इशारा बावनकुळे यांनी दिला होता. याचवेळी खासदार रणजित निंबाळकर यांनी इवढी कामे केली आहेत की आता त्यांचा नंबर देशातील टॉप 10 खासदारांच्यात असल्याचंही सांगत निंबाळकर यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई नाहीच
माळशिरसचा कार्यक्रम संपवून अकलूज येथे माढा लोकसभा वॉरियर्सच्या बैठकीत निंबाळकर आणि मोहिते पाटील हे दोन्ही नेते सोबत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मात्र मंगळवारच्या बैठकीतील फोटो बाहेर आल्यावर दोन्ही नेत्यांची तोंडे दोन दिशेला असल्याचे समोर आले. या दोन्ही नेत्यात समेट घडविण्यात अपयश आलेल्या बावनकुळेंना जेव्हा माध्यमांनी बोलण्यासाठी आग्रह केला तेव्हा त्यांनी बोलणे टाळून आज पंढरपुरात बोलू असे सांगून वेळ मारून नेली.
दिवसभर माढ्यात असूनही खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोघांना समोरासमोर आणण्याचं कसब हे बावनकुळेंना साधता आलं नाही. शेवटपर्यंत दोन्ही नेत्यांनी समोर येऊन वाद संपल्याचे सांगितले नाही. उलट रात्री बावनकुळे हे मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी भोजनास गेले तेव्हा खासदार रणजित निंबाळकर माळशिरस येथे कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी निघून गेले .
दोन्ही नेत्यात वाद संपवण्यास अपयश येत आल्याचे पाहून बुधवारी पंढरपूर येथे या वादावर बोलताना भाजप कोणाला तिकीट देईल आणि कोणाला बसवलं हे सांगता येत नाही असे बावनकुळे यांनी सांगितले. आपणासही यावेळी निवडणूक लढवू दिली नाही असे सांगत त्यांनी माढा लोकसभेचे तिकीट कुणालाही मिळू शकेल असे सांगत दोन्ही नेत्यांना झुलवत ठेवण्याचा प्रयत्न केला.
मोहिते पाटलांमुळे माढ्याची जागा भाजपच्या पारड्यात
खरेतर 2019 साली मोहिते पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर भाजपाला राष्ट्रवादीच्या ताब्यातील माढा लोकसभेची जागा जिंकता आली होती. घरात खासदारकी असताना मोहिते पाटील यांनी रणजित निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना सव्वा लाखाच्या फरकाने जिंकून आणले. मात्र नंतरच्या काळात किरकोळ मुद्द्यावरून निंबाळकर आणि मोहिते यांच्यात वादाला सुरुवात झाली आणि ते वाढतच गेले.
नंतरच्या काळात निंबाळकर यांनी सर्व मोहिते विरोधकांची मोट बांधून त्यांना शह देण्यास सुरुवात केली. यातच मोहिते पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे काम आपणच करत असल्याचे सांगत पाठपुरावा करण्यास सुरुवात केल्याने मोहिते आणि निंबाळकर यांच्यात टोकाचे मतभेद तयार झाले.
धैर्यशील मोहिते पाटलांचा माढ्यावर दावा
एकेकाळी विजयसिंह मोहिते पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात वर्चस्व होते. कालांतराने हळूहळू हे वर्चस्व कमी झाले असले तरी आजही माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला पडण्याइतकी ताकद मोहिते पाटील यांच्यात नक्की आहे. आता माढा लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी चार आमदार हे उघड रणजित निंबाळकर यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. उरलेले दोन आमदार अजून तटस्थ आहेत. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढा आणि करमाळ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे यांनी आपली ताकद निंबाळकर यांच्या पारड्यात टाकली आहे.
सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे देखील निंबाळकर यांच्या मागे आहेत. अशावेळी निंबाळकर यांचे काम आणि पारडे जड दिसत असले तरी मोहिते पाटील यांचा करिष्मा आजही कायम आहे. यामुळेच भाजपच्या या घडामोडींवर शरद पवार हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
भाजपाला हा वाद संपविण्यात अपयश आल्यास मोहिते पाटील यांना इंडिया आघाडीकडून लढवण्यासाठी पवार गट हालचालीच्या तयारीत आहे. अशावेळी मोहिते आणि निंबाळकर यांचा वाद संपविण्यासाठी अखेर देवेंद्र फडणवीस याना प्रयत्न करावे लागणार असल्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: