(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartiki Ekadashi 2023: विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत यंदा प्रथमच भाविकांच्या आरामाची व्यवस्था; 4 वर्षानंतर जनावरांचा बाजार भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक धाडसी निर्णय
Pandharpur News: यंदा कार्तिकी यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. तसेच विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
Maharashtra Pandharpur News: यंदा कार्तिकी यात्रेच्या (Pandharpur Kartiki Yatra 2023) शासकीय महापूजेस कोणाला पाठवावे याबाबत शासन पेचात सापडले असताना सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. यंदा प्रथमच कार्तिकी सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांना थकवा जाणवल्यास चार ठिकाणी आरामाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. तासन्तास दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना आराम मिळावा, त्यांची बैठक व्यवस्था आणि त्यांना इतर गरजेनुसार वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी दर्शन रांगेत चार ठिकाणी हि स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी कार्तिकी यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. दर्शन रांगेमधील घुसखोरी थांबवण्यासाठी बॅरिगेटिंगमधील अंतर कमी करणे, ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, पोलीस सुरक्षित वाढ करणं, असे निर्णय घेताना वर्षानुवर्ष दर्शन रांगेत होत असणाऱ्या घुसखोरीवर पायबंद घालण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना चंद्रभागेचे पवित्र स्नान करण्यासाठी आता 14 किंवा 15 नोव्हेंबर रोजी उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या चार वर्षापासून बंद असलेला जनावराचा बाजार यंदा वाखरीच्या पालखीतळावर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांची वैद्यकीय तपासणी करूनच आवश्यक पद्धतीने जनावरांचा बाजार भरला जाणार आहे. सध्या राज्यात ज्या भागात लंम्पि आहे त्या भागातील जनावरे आली तर त्यांची तपासणी करून लक्षणे आढळल्यास त्यांची वेगळी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
यंदा केवळ चंद्रभागा बस स्थानकात एसटी बसेसची व्यवस्था केली जाणार असून शहरातील जुन्या आणि नव्या बस स्थानकात बस वाहतूक केली जाणार नसल्याने शहरातील वाहतूक कोंडीला आळा बसेल असे त्यांनी सांगितले. शहरातील ड्रेनेजचे पाणी ज्या पद्धतीनं चंद्रभागेत मिसळत होते त्यावर देखील त्यांनी पालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यंदा कार्तिकी यात्रेत जिल्हाधिकारी चार दिवस पंढरपुरात मुक्कामी राहून संपूर्ण यात्रा व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहेत. यंदा मराठा आरक्षणामुळे कार्तिकी यात्रा महापूजेसाठी कोणत्याही मंत्री, आमदार खासदाराला महापूजेस येण्यास मराठा समाजाने मज्जाव केला असल्याने यात्रेवर याचे सावट असले तरी प्रशासनाने यात्रेसाठी येणाऱ्या 10 ते 12 लाख लोकांच्या स्वागताच्या जय्यत तयारीला सुरुवात केली आहे.