Heatstroke : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
Heat Wave : राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोलापूर : मार्च महिन्यातच राज्यात तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. आयएमडीने (IMD) यंदा महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये तापमान अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तापमान अधिक राहणार असून तीन महिन्यांतील 20 दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा अंदाजही आयएमडीने व्यक्त केला आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींना उष्माघात (Heatstroke) होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत नवले (Dr. Prashant Navle) यांनी केले आहे.
सोलापूर (Solapur News) जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा 45 अंशापर्यंत पोहचतो. आताच एप्रिल अखेर शहरातील तापमान 43 अंश इतके झाले आहे. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली आहे. जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी ग्रामीण भागातच झाला. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्मघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. या रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात 77 प्राथमिक आरोग्य केंद्रावर स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यांसह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उष्माघात होण्याची कारणे
शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.
उष्माघाताची लक्षणे
मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्त दाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था आदी.
'या' व्यक्तींनी घ्यावी अधिक काळजी
बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार .
असे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेरजाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा.घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या मनपाच्या आरोग्य केंद्रात, रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा.
उपचार पुढीलप्रमाणे
रुग्णास प्रथम सावलीत आणावे. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत. रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डी-हायड्रोशन टाळावे. चहा, कॉफी देवू नये. रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात.थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंतवरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात, रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा.
आणखी वाचा