Pandharpur : फक्त मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनाच व्हीआयपी दर्शन; बाकी मंत्री, आमदार-खासदारांनी सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शन
Ashadhi Wari : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे त्यांच्या सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार-खासदारांच्या सोबत पंढरपुरात आले आहेत.
पंढरपूर: आपल्या मोठ्या लवाजम्यासह पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी फक्त चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार असून त्याच्यासोबत आलेल्या इतर मंत्री, आमदार, खासदारांना सोडण्यात येणार नसल्याचं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. आषाढी वारी सुरू असल्याने व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. हे सगळेजण मंगळवारी सकाळी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं दर्शन घेणार आहेत. चंद्रशेखर यांच्या सोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, त्यांच्या सर्व आमदार आणि खासदार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. या सर्वांना व्हिआयपी दर्शन देता येणं शक्य होणार नाही असं मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी हे शेकडो किलोमीटर चालून विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. अशावेळी व्हीआयपी दर्शनामुळे त्यांच्या दर्शनामध्ये खोळंबा होतो. त्यामुळे यंदापासून व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच आता केवळ तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन देण्यात येणार असून आमदार आणि खासदार तसेच मंत्र्यांना सर्वसमान्यांच्या रांगेतून दर्शन घ्यावं लागणार आहे.
राजशिष्टाचारानुसार एखादा राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्री येत असताना त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणे गरजेचे असते, मात्र केवळ राजकारणापोटी केसीआर यांच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी परवानगी नाकारण्यात आली आहे असा आरोप बीआरएस पक्षाकडून करण्यात येत आहे.
हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी नाकारली
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हेलिकॉप्टरने करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीला अखेर प्रशासनाने परवानगी नाकारली. पाच लाखापेक्षा जास्त वारकरी भाविक वाखरी रिंगण सोहळ्यात उपस्थित राहतात या कारणाने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगी नाकारल्याची माहिती आहे.
प्रशासनाच्या या निर्णयावर बीआरएस पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. इथल्या सरकारने वारकऱ्यांवरती लाठ्या बरसवल्या आम्ही जर पुष्पवृष्टी केली तर लोकांमध्ये नकारात्मक मेसेज जाईल म्हणून परवानगी नाकारण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय. केसीआर यांच्या दौऱ्यात तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेते असतील. तेलंगणातून तब्बल 600 गाड्यांचा ताफा आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
ही बातमी वाचा: