Ashadhi Wari : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची शेकडो गाड्यांसह सोलापुरात सिंघम स्टाईलने एन्ट्री, अख्खं मंत्रिमंडळ उद्या घेणार विठ्ठलाचं दर्शन
K Chandrashekar Rao at Solapur : आपल्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सोलापुरात दाखल झाले आहेत.
सोलापूर : तेलंगाणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापूर शहरांमध्ये आगमन झालं आहे. सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून सोलापूरातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच के. चंद्रशेखर राव यांच्या गाडीवर केला गुलाब पुष्पांचा वर्षाव करतं त्यांचं स्वागत केलं. केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम असून मंगळवारी त्यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय. केसीआर यांच्या दौऱ्यात तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेते असतील. तेलंगणातून तब्बल 600 गाड्यांचा ताफा आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
बीआरएसच्या रिंगण सोहळा आणि विठ्ठल मंदिरावरील हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीला अद्यापही परवानगी देण्यात आली नाही. बीआरएसतर्फे पंढरपूर येथे एका महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपाचे हेलिपॅड देखील उभारण्यात आलं आहे. मात्र पुष्पवृष्टीसाठी अद्यापही प्रशासनाने दिली परवानगी दिली नाही. राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन प्रशासन विविध पद्धतीच्या परवानग्या नाकारत असल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीने केला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज सकाळीच तेलंगणावरुन निघाले. सोलापूरकडे रवाना झालेला ताफा जेवण्यासाठी धाराशिवमधील उमरग्यामध्ये थांबला होता. जेवणानंतरज त्यांचा ताफा संध्याकाळी सोलापूरमध्ये दाखल झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या स्वागताचे बॅनर सोलापुरात झळकलेत. प्रत्येक दहा किलोमीटरच्या अंतरावर एक अशा पद्धतीने सुमारे 100 हून अधिक स्वागताचे बॅनर लावल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.
हिंदूराष्ट्र सेनेचा विरोध
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना विठ्ठल-रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन देण्यास हिंदुराष्ट्र सेनेने विरोध केलाय. सोलापुरातील हिंदुराष्ट्र सेनेचे तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. वारकरी 25-30 दिवस चालत येऊन रांगेतून दर्शन घेत असताना केसीआर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन का, असा सवाल हिंदुराष्ट्र सेनेने केलाय.
ही बातमी वाचा: