Ajit Pawar : पाण्यासाठी आवश्यक असलेला पैसा पुढच्याच आठवड्यात पाठवला जाईल, सोलापूरच्या पाणीप्रश्नासाठी अजित पवारांचा 'शब्द'
Ajit Pawar : सोलापुरातील पाणीप्रश्नासाठी आवश्यक असणारा पैसा पुढच्या आठवड्यात पाठवला जाईल, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.
सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) पाणीसाठी पैशाची आवश्यकता आहे, पुढच्याच आठवड्यात पैसे पाठवले जातील, मी हा शब्द देतोय. मी शब्द देताना शंभरवेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूरच्या पाणीप्रश्नावर भाष्य केलं. सोलापूरने राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद दिलंय. पण आज सोलापूरला पाणी मिळत नाहीये. ऑक्टोबरमध्ये उजनीत 60 टक्के पाणी होत. आता मायनसमध्ये पाणी गेलंय. यामध्ये चूक कोणाची असा सवाल देखील अजित पवारांनी या निमित्ताने उपस्थित केलाय.
सोलापूरचा पाणीप्रश्न मागील अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे. त्यावरच अजित पवारांनी हा प्रश्न लवकरात लवकर संपणावर असल्याचं भाष्य करत आवश्यक ती मदत करण्याचं देखील आश्वासन दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर कार्यालयाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी सोलापूरच्या पाणीप्रश्नी भाष्य केलं.
तुमच्या सर्वांच्या ताकदीने सोलापूर राष्ट्रवादीमय करुयात - अजित पवार
माजी आमदार रविकांत पाटील, बिज्जू प्रधाने, इरफान शेख, मंदाकिनी तोडकरी या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश यावेळी केला. त्यांचे आभार अजित पवारांनी यावेळी मानलेत. तसेच तुमच्या सर्वांच्या ताकदीने सोलापूर राष्ट्रवादीमय करुयात असा विश्वास देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कष्ट आणि मोलमजरी करणाऱ्यांचे हे सोलापूर शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला चांगलं घर मिळावं, यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घरांचे लोकार्पण देखील करण्यात आले, असंही अजित पवारांनी म्हटलं.