Sharad Pawar : अखेर शरद पवारांचं ठरलं! कापसेवाडीत शेतकरी मेळावा होणारचं; दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे दिवाळी झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे दिवाळी झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. शरद पवार हे 16 नोव्हेंबरला माढा (Madha) लोकसभा मतदारसंघातील कापसेवाडीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सध्या या तिन्ही जिल्ह्यात बेदाणा, दूध आणि टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या संदर्भात शरद पवार हे कापसेवाडीत शेतकरी मेळावा घेणार आहेत.
तब्बल 94 हजार टन बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये पडून
सध्या राज्यात 2 लाख 57 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. यातील तब्बल 94 हजार टन बेदाणा योग्य दर मिळत नसल्याने अजुनही कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बेदाण्यावरील निर्यात शुल्क कमी करुन आयात शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन बापू कापसे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी आज वाय बी चव्हाण सेंटर मुंबईत येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी तातडीने कापसेवाडी येठील मेळाव्याला येण्याचं मान्य केल्याची माहिती नितीन बापू कापसे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार कापसेवाडीत येणार
द्राक्षाचे भाव गडगडल्या मुळे त्यातुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बेदाणा तयार केला. त्यामुळे बेदाण्याचे दर कोसळले. सध्या वाढलेले टॉमेटोचे दरही कोसळले आहेत. दुध उत्पादकही दर कमी झाल्याने अडचणीत आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार कापसेवाडीत येणार आहेत. दरम्यान, 23 ऑक्टोबरला देखील शरद पवार हे कापसेवाडीत येणार होते. मात्र, अचानक ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला होता. मात्र, येत्या 16 नोव्हेंबरला शरद पवार कापसेवाडीत येणार असल्याची माहिती कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांनी दिली.
शरद पवार यांच्या माढा दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. 23 ऑक्टोबरच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील आयोजकांकडून करण्यात आली होती. मात्र शरद पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्या दिवशी शरद पवार हे बारामतीतून सोलापूरला न जाता शरद पवार थेट पुण्याला गेले. हा दौरा का रद्द करण्यात आला याची कोणतेही कारण समोर आले नाहीत. अचानक दौरा रद्द झाल्यानं कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले होते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या: