(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur News: निवडणूक संपताच मविआच्या नेत्यांवर गंडांतर! बँकेतील कोटींच्या नुकसानीची होणार वसुली, या दिग्गज नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आल्याने एकच खळबळ उडाली. यात अनियमित कर्ज वाटपामुळे हे बँकेचं एवढ्या कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळी या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांचा समावेश आहे. आता राज्यात निवडणूक संपताच महाविकास आघाडीचे नेते अडचणीत येत असल्याच्या चर्चा या निमित्ताने रंगल्या आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अनियमित कर्ज वाटपामुळे हा फटका बसल्याचा समोर आला आहे. या रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी याप्रकरणी अडचणी देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही बँक पूर्वी ही खूप सक्षम बँक होती. मात्र नंतरच्या काळात राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या पद्धतीने कर्जाचा वाटप झालं आणि हे कर्जाची रिकव्हरी न झाल्यामुळे बँक बंद होण्याच्या मार्गावर आली. सध्या बँकेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेची चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये अनेक जणांची नावे समोर आलेली आहेत. त्यांच्या अडचणी आता वाढणयाची शक्यता आहे.
कोणत्या नेत्यांच्या नावांचा समावेश?
यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर तीस कोटी सत्तावीस लाख याची जबाबदारी फिक्स करण्यात आली आहे. माजी मंत्री आणि आता आमदार म्हणून निवडून आलेले दिलीप सोपल त्यांच्यावरही 30 कोटीची जबाबदारी आहे, दुसरे संचालक दीपक आबा साळुंखे जे सांगोल्यातून शिवसेना ठाकरे गटाकडून उभे राहिले होते त्यांच्यावर वीस कोटी बहात्तर लाखाची थकबाकी दाखवण्यात आलेली आहे, अशा पद्धतीने अनेक नेते आहेत. यामध्ये दिवंगत नेते सुधाकर परिचारक, दिवंगत सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याही नावांचा समावेश आहे.
माजी आमदार राजन पाटील, गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप जवळपास 32 संचालकांची नावे यामध्ये आहेत. जे राजकारणात सुद्धा दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात, याशिवाय दोन अधिकारी असे मिळून एकूण 35 जणांवरती जबाबदारी फिक्स करण्यात आलेली आहे. या नुकसानींना त्यांना जबाबदार धरलं जात आहे. 238 कोटी 43 लाख रुपयांची 12% व्याजाने वसूल करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हे सर्वच नेते आता अडचणीत येणार आहेत. एकेकाळी ही एक मोठी आणि चांगली बँक म्हणून ओळखली जात होती. ती सध्या ज्या गोष्टींमुळे अडचणीत आली, त्या वसुलीसाठी आता आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता बहुतांश नेते ते महाविकास आघाडीतील असल्यामुळे वसुलीची सुरुवात होणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे आता काही नेते आर्थिक अडचणी सापडण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री दिलीप सोपल (30.27 कोटी), विजयसिंह मोहिते पाटील (30.05 कोटी), दीपक साळुंखे (20.72 कोटी), सुधाकर रामचंद्र परिचारक (11.83 कोटी), अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (16.99 कोटी), भाजप आमदार समाधान अवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे (11.44 कोटी), दिलीप माने (11.63 कोटी), सुनंदा बाबर (10.84 कोटी), संजय शिंदे (9.84 कोटी), दिवंगत माजी आमदार एस. एम. पाटील (8.71 कोटी), चंद्रकांत गणपतराव देशमुख (8.41 कोटी), जयवंत जगताप (7.30 कोटी). रणजितसिंह मोहिते पाटील (55.54 लाख), राजन पाटील (3.34 कोटी), रामचंद्र महाकू वाघमोडे (1.48 कोटी), राजशेखर शिवदारे (1.48 कोटी), अरुण कापसे (20.74 कोटी), संजय नामदेव कांबळे (8.41 कोटी), बहिरू संतू वाघमारे (8.41 कोटी), सुनील नरहरी सातपुते (8.41 कोटी), चांगदेव शंकर अभिवंत (1.51 कोटी), रामदास बिरप्पा हाक्के (8.41 कोटी), विद्या अनिलराव बाबर (1.51 कोटी), रश्मी बागल (43.26 लाख), नलिनी सुधीरसिंह चांदेले (88.58 लाख), सुनिता शशिकांत बागल (1.51 कोटी) या प्रमाणे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक किसन विश्वंभर मोटे, काशिलिंग रेवणसिद्ध पाटील आणि सनदी लेखापालावरही आर्थिक नुकसानीचा ठपका ठेवण्यात आला आहे.