कोल्ह्यांना पळवण्यासाठी स्पीकरवर वाघाचा आवाज, चिपी विमानतळावरील डोकॅलिटीने हास्यकल्लोळ
Chipi Airport : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर सध्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना, मात्र हे खरं आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील चिपी विमानतळावर सध्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना, मात्र हे खरं आहे. मुंबईतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमान लँडिंग होते, तेव्हा विमानतळावर वाघाच्या डरकाळ्या ऐकू येतात. अर्थात यामागचे कारण काहीस वेगळं आहे. या खऱ्याखुऱ्या वाघाच्या डरकाळ्या नसून विमानतळ परिसरात असलेल्या कोल्ह्यांना पळवण्यासाठी वापरलेली ही एक नामी युक्ती आहे. ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून वाघाच्या डरकाळ्या लावल्या जातात. तिथे असणाऱ्यांना काही काळ वाघच आल्यासारखी जाणीव होते. मात्र ही युक्ती वापरुन कोल्ह्यांना पळवण्यात कितपत यश येईल हे पाहावं लागेल.
चिपी विमानतळ सुरु होऊन काही दिवस होत नाही तोपर्यंत नवीन समस्या उभी राहिली. कोल्ह्यांनी विमानतळ परिसरात वास्तव्य केलं असून ते सतत धावपट्टीवर येतात. यामुळे लॅण्डिंग आणि टेक-ऑफ करताना अडथळे येतात. कर्मचाऱ्यांकडून कोल्ह्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न होत असला तरी यामुळे लॅण्डिंग आणि टेकऑफला उशीर होतो.
विमानतळाच्या धावपट्टीवर अधून-मधून कोल्ह्यांचे दर्शन होत असल्याने त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने अनेक वेळा प्रयत्न केले. आताही या परिसरात कोल्ह्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र कोल्हे पिंजऱ्यामध्ये न जाता चकवा देत विमानतळ परिसराच्या बाहेरील भागात वावरताना दिसतात. या कोल्ह्यांना पळवून लावण्यासाठी विमान येण्याअगोदर काही काळ ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून वाघाचा आवाज विमानतळाच्या धावपट्टी परिसरात लावला जात आहे. मात्र वाघाच्या सान्निध्यात जंगलात राहणारा कोल्हा या आवाजाने पळून जाईल का? हा संशोधनाचा भाग आहे.
बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर महत्त्वाच्या मंत्री, राजकीय नेत्यांच्या उपस्थित पार पडले. चिपी विमानतळाची चर्चा मागील अनेक वर्षांपासून होती. सिंधुदुर्ग जिल्हा हा आधीच पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या विमानतळापासून कुडाळ तालुका 24 किमी तर मालवण तालुका 12 किमी अंतरावर आहेत. त्यातच हा जिल्हा गोव्याला लागून आहे. चिपी विमानतळ सुरु झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर इकडे वळतील, अशी अपेक्षा आहे.
अलायन्स एअरने 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी नियमित विमान सेवा सुरु केली आहे. ही कंपनी चिपी विमानतळावर विमान चालवणारी पहिली देशांतर्गत एअरलाईन्स असेल. केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्ही स्कीम अंतर्गत ही सेवा सुरु राहणार आहे.