Sindhudurg: अनैतिक संबंधात अडथळा ठरतोय म्हणून सिंधुदुर्गात प्रेयसीच्या पतीचा काढला काटा; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
Sindhudurg Murder : पश्चिम बंगालमधून सिंधुदुर्गात आलेल्या व्यक्तीची स्थानिक नागरिकाने हत्या केली होती, त्याला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Sindhudurg Murder : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा गडगेवाडी येथे भाड्याने राहणाऱ्या विश्वजीत मंडल या पश्चिम बंगालमधील कामगाराचा सुखदेव सोपान याने लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन त्यांचा खून केला. 5 जून 2021 सालची ही घटना असून न्यायालयाने या प्रकरणात आज आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरतोय म्हणून ही हत्या करण्यात आली होती.
विश्वजीत मंडल हा आपली पत्नी आणि मुलांसह राहत होता. आरोपी सुखदेव बारीक हादेखील याच परिसरात राहत होता. मयत विश्वजीत मंडल याच्या पत्नीशी सुखदेव सोपान याचे अनैतिक संबंध होते. त्या प्रेमसंबंधाला सुखदेव बारीक हा विरोध करत होता. म्हणून आरोपीने विश्वजीत मंडल यास जीवे मारले. 5 जून 2021 रोजी मध्यरात्री 1 वाजता विश्वजीत कालीपद मंडल याच्या घरात प्रवेश करुन त्याची पत्नी आणि दोन मुलांना बेडरुममध्ये कोंडून ठेवले. तर विश्वजीत मंडल याला लोखंडी टीकावाने जबर मारहाण करुन त्यांचा खून केला आणि पुरावे नष्ट करुन रेल्वेने पळून गेला. सदर घटनेच्या आधारे बांदा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 302, 201, 341 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर खटला सिद्धदोषापर्यंत पोहोचला. सुनावणी दरम्यान सरकारतर्फे 12 महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या नातेवाईकांनी मयत यांची पत्नी आणि मुलांना फितूर करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या उलट तपासात महत्त्वाच्या कबुल्या मिळून अखेर सत्य बाहेर आले.
शासकीय वैद्यकीय अधिकारी, वोडाफोन कंपनीचे नोडल ऑफिसर आणि रेल्वे अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. अखेर क्रूरपणे गुन्हा करणाऱ्या अपराध्यास जन्मठेपेच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. हा न्यायनिर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी दिलेला असून आरोपीस भा. दं. वि. कलम 302 अन्वये जन्मठेप, भा. दं. वि. कलम 201 अन्वये 03 वर्षे सश्रम कारावास, भा. दं. वि. कलम 341 अन्वये 1 महिना कारावास आणि एकूण 12,500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे.
अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात 20 जून रोजी आढलेला अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाने त्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्या मृत व्यक्तीसंदर्भात कुणाकडे माहिती असेल किंवा कोणी त्या व्यक्तीला ओळखत असेल तर त्याने सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकात नंबर देखील दिले आहेत.