फी भरण्यास पैसे नसल्यानं महाविद्यालयाकडून त्रास, शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
दिपक केसरकर यांच्या मतदारसंघात विद्यार्थ्याला फी भरण्यास उशीर झाला म्हणून गरीब आहात लायकी नाही तर शिक्षण कशाला? अशा भाषेत अधिकाऱ्यांने अपमान केल्यामुळे नैराश्यात विद्यार्थ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला.
Sindhudurg Latest News Update : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या मतदारसंघात “फी” न दिल्याच्या रागातून शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून हीन वागणूक मिळाल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सावंतवाडी मधील माडखोल येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघड झाला. विद्यार्थ्याला घराच्या छप्पराची कौले काढून वाचविण्यात यश आले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माडखोल येथे घडली. दरम्यान याची गंभीर दखल ग्रामस्थांकडून घेण्यात आली असून संबधित प्रशासकीय अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तौसिफ सय्यद करीत आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे असलेल्या एका संस्थेचे एक महाविद्यालय आहे. त्या ठिकाणी गावातील स्थानिक विद्यार्थी दुसर्या वर्षासाठी शिक्षण घेत होता. त्याने गेले काही महिने फी भरली नव्हती. त्यामुळे संबधित महाविद्यालयच्या प्रशासकीय अधिकार्याने फी साठी त्याच्याकडे तगादा लावला होता. तसेच वारंवार फी न दिल्यामुळे त्याला तुम्ही गरीब आहात, भिकारी होता, तर एवढे महागडे शिक्षण कशासाठी घेत होता? असा प्रश्न करून त्या विद्यार्थ्यांला त्रास दिला जात होता. त्यामुळे मानसिक नैराश्य आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांने आई-बाबा मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून ठेवत आपल्या घरातील पडवीत साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा प्रकार करण्यापूर्वी चिठ्ठी दरवाजावर चिकटवली होती. त्यामुळे घरातील व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा तोडण्यास ते असमर्थ ठरले. यावेळी छप्पराची कौले काढून त्याला वाचविण्यास यश आले. या प्रकाराने भयभीत झालेल्या घरातील व्यक्तीसह शेजार्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या प्रकारा विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. झालेला प्रकार हा योग्य नाही, काही झाले तरी संबधित प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच संबधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट केलं आहे. कठोर कारवाई तर कराच परंतु अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्या असं ट्वीटमध्ये म्हटलेय.
सिंधुदुर्गातील माडखोल येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याला फी भरण्यास उशीर झाला म्हणून गरीब आहात लायकी नाही तर शिक्षण कशाला?अशा भाषेत अपमान केला
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 24, 2022
त्यामुळे नैराश्य येवून संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला
कठोर कारवाई तर कराच परंतु अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्या