Maharashtra Politics : विकास कामासाठी असलेला पैसा खासगी मेडिकल कॉलेजसाठी वापरला; नारायण राणेंवर वैभव नाईकांचा आरोपांचा प्रहार
Narayan Rane vs Vaibhav Naik : सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने 'होऊ दे चर्चा' अभियान सुरू करण्यात आले आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे.
कुडाळ, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg) विकास कामांना आणि शासकीय कामाना स्थगिती देऊन त्याचे पैसे राणेंच्या खाजगी मेडिकल कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पाच कोटी खर्च करण्यात आल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Snea UBT) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. वैभव नाईक यांच्या या आरोपाने आता पुन्हा एकदा राणे विरुद्ध नाईक (Rane vs Naik) असा कलगीतुरा कोकणात रंगण्याची चिन्हे आहेत.
सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने 'होऊ दे चर्चा' अभियान सुरू करण्यात आले आहे. आज, कुडाळ मालवण मतदार संघात हे अभियान राबविण्यात आले आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थित 'होऊ दे चर्चा' अभियान घेण्यात येत आहे. अभियान निरीक्षक गुरुनाथ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या अभियानाद्वारे लोकांसोबत चर्चा करून भाजप सरकारने मागच्या 9 वर्षांत 'अच्छे दिन' च्या नावाखाली दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने फसवणूक केली आहे. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी आश्वासन दिली होती, त्याचं काय झालं याची चर्चा दबक्या आवाजात केली जात होती, त्याला आम्ही व्यासपीठ मिळवून दिले असल्याचे नाईक यांनी म्हटले. महाराष्ट्रात आमचं सरकार जाऊन गद्दराचे सरकार आले. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये औषध नाहीत. चिपी विमानतळ आघाडी सरकारने सुरू केले होते. मात्र, आता ते बंद पाडण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासकीय योजनांचा पैसा राणेंच्या खासगी कॉलेजच्या रस्त्यासाठी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांना तसेच शासकीय कामांना स्थगिती देण्यात आली. त्यातील 5 कोटींचा निधी हा नारायण राणेंच्या खाजगी मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खर्च करण्यात आल्याची टीका यावेळी वैभव नाईक यांनी 'होऊ दे चर्चा' व्यासपीठाकरून केली. सर्वसामान्य जनतेचे पैसे राणेंच्या खाजगी रुग्णालयासाठी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. राज्यातील दीड लाख नोकरभरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून त्यांची कंत्राट भाजपच्या आमदारांच्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला. राज्य सरकार शासकीय शाळा बंद करून खाजगीकरण करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य मुलांना शाळा राहिल्या नाहीत, त्या शाळेमध्ये शिक्षक राहिले नाहीत. शालेय शिक्षण मंत्री याचं जिल्यातील असून त्यांनी जून मध्ये सांगितलं जुलैमध्ये शिक्षक भरती केली जाणार, ऑगस्टमध्ये शिक्षक भरती केली जाणार, सप्टेंबर मध्ये शिक्षक भरती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त आश्वासने दिली जातं असल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारी पक्ष आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला होता. त्याच पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकणार होते. मात्र, ते नेते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जात असल्याचे त्यांनी म्हटले.
नेत्यांची भाषणे, जनतेसोबत संवाद कुठं?
या अभियानाद्वारे लोकांसोबत चर्चेऐवजी नेत्यांनी भाषणं केली. सर्वसामान्य जनता या चर्चेत अलिप्त राहिल्याचे चित्र दिसत होते. कुडाळ शहरात आज बाजार भरला होता. मात्र या बाजारपेठेत लोकांसोबत चर्चा केली जाणार होती. आमदार वैभव नाईक, अभियान निरीक्षक गुरुनाथ खोत, उपनेते गौरीशंकर खोत यांनी भाषण केली आणि ही चर्चा लोकांसोबत कुठेही दिसली नाही. याबाबत विचारले असता आमदार वैभव नाईक यांनी यापुढच्या गावागावांत जाऊन चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले.