... याच वाघाने डरकाळी फोडली तेव्हा महाराष्ट्रात काय झालं हे सर्वांनी पाहिलं; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Deepak Kesarkar : बाळासाहेबांचा विचार जिवंत रहावा म्हणून आम्ही उठाव केला आणि तो यशस्वी झाला असं राज्याचे मंत्री आणि एकनाथ शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग : वाघाला चित्ता म्हटलं म्हणून वाघाचा चित्ता होत नाही, वाघ हा वाघाचं असतो. याचं वाघाने डरकाळी मारली तेव्हा महाराष्ट्रात काय झालं हे सर्वांनी बघितलं असा टोला राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांनी नामिबियावरुन चिता आणण्याच्या केंद्राच्या कृतीवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं.
बाळासाहेबांच्या विचारापासून लांब गेलेले जे अजूनही शिल्लक लोक राहिलेले आहेत, ते काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडण्याचं धाडस दाखवत नाहीत असा टोमणा राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
दीपक केसरकर म्हणाले की, "बाळासाहेबांची शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस करत होती, तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. बाळासाहेबांचा विचार जिवंत रहावा म्हणून आम्ही उठाव केला आणि तो यशस्वी झाला. आम्हाला बाळासाहेबांचे विचार, प्रथा आणि परंपरा जिवंत ठेवायच्या आहेत. त्यासाठी जे जे करावं लागेल ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वांखाली करणार."
बाळासाहेबांच्या विचारांचे सोनं दसरा मेळाव्याला लुटणार आहोत. अनेक लोकांना भारतीय संस्कृती म्हणजे कमीपणा वाटतो. मात्र ते सत्तेच्या राजकारणात कसे चालतात? असा सवालही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करायचं होतं. तेव्हा कॅबिनेटमध्ये अनेक लोकांनी कॅबिनेटला दांडी मारली होती. मात्र आम्ही नामांतर केलं अशी खोटी जाहिरात केली. आम्हाला तो ठराव पुन्हा घ्यायला लागला. त्यामुळे आता राजकारण पुरे झालं, विकासाची कामे करुयात.
दीपक केसरकर म्हणाले की, "गृहपाठ बंद करावा हा विषय अजून फायनल झालेला नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच गृहपाठ बंद करावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्यामुळे गृहपाठ बंद करावा असा निर्णय घेण्यात आला."
राज्यातील निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप युती होऊन 2019 चं चित्र पुन्हा एकदा दिसेल, विरोधकांची दाणादाण उडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.