Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाड्यासह कोकणाला अवकाळी पावसानं झोडपलं; रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान, IMDचा इशारा काय?
Unseasonal Rain : कोकण, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. पाऊसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Unseasonal Rain : विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि भंडारासह मराठवाड्यातील बीड, लातूरसह धाराशिवमध्येही पावसाने दमदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळालंय. अवेळी पडलेल्या या विजांच्या कडकडाटासह पाऊसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान (Crops Loss) होण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भ (Vidharbha Unseasonal rain) मराठवाड्यातील शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. (Maharashtra Weather Forecast Today)
Nagpur IMD : विदर्भात पुढची दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा
नागपुरात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोराचा अवकाळी पाऊस झालाय. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने दिसून आलं. तर काही ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली. दुसरीकडे नागपूरच्या मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडगाभर पाणी साचले होते. त्यामुळे चाकरमान्यांना आज सकाळच्या सुमारास याच पाण्यातून मार्ग काढावा लागलाय. शिवाय यावेळी मोठ्या वाहतूक कोंडीचाही फटका सहन करावा लागला आहे. मनीषनगर प्रमाणे अशीच काहीशी परिस्थिती सोनेगाव, सोमलवाडा भागात पाहायला मिळाली आहे. दरम्यान नागपूर वेधशाळेने (Nagpur IMD) दिलेल्या माहितीनुसार विदर्भात व मध्यभारताच्या वर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढची दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Latur Rain: लातूरमध्ये रात्रीपासून पावसाची हजेरी
दुसरीकडे, लातूर शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर शहरासह परिसरात दिलासा देणारा पाऊस पडला आहे. मध्यरात्री सुमारे तीन वाजता शहरातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सकाळी सहा ते सातच्या सुमारास राजीव गांधी चौक, उद्योग भवन, गरुड चौक या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत शहराच्या विविध भागांत वेगवेगळ्या वेळेला पावसाच्या सरी कोसळल्याने काही काळासाठी रस्त्यांवर पाणी साचले. मात्र या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्या अवकाळी पावसामुळे ज्वारीचे मोठं नुकसान
धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांने काढून टाकलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. शेतात काढून ठेवलेल्या ज्वारीवर पावसाचे पाणी साचल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. तसेच हरभरा, द्राक्ष, आंबा, गहू या रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने ज्वारी पिकाचे नुकसान पाहायला मिळत आहे.
Beed Rain : शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी
बीडच्या मांडेखेल शिवारात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल अचानक पावसामुळे ज्वारी पिकाला मोठा फटका बसला असून उभे पीक आडवे पडले, तसेच काही ठिकाणी कणसांना पाणी लागले आहे. यामुळे ज्वारीचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अवकाळी पावसामुळे झालेले हे नुकसान त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Sindhudurg Rain : आंबा, काजू पिकांना फटका बागायतदारांची चिंता वाढली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून वातावरणात बदल झाला असून आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यातच काल सायंकाळी फोंडाघाट परीसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वातावरणाचा फटका आंबा, काजू पिकांना बसणार असल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























