ह्रदयद्रावक... अंगावर झाड कोसळून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; दरड कोसळल्याने घराचेही नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालक्यातील तळवडे गावात एका महाविद्यालयीन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

सिंधुदुर्ग : सध्या पावसाळा सुरू असून हत्ती नक्षत्रात सर्वत्र मुसळधार पाऊस (Rain) कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, मुंबई, कोकणात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे, मुंबईतही मुख्यमंत्र्यांनी आणि इतर ठिकाणी जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला असून पावसाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. डोंगराळ प्रदेशातील नागरिकांनाही दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन अतिदक्षता घेण्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, तरीही दरडी कोसळण्याच्या व भींत कोसळणे, किंवा झाडपडीच्या घटना घडत आहे. सांवतवाडी (Sindhudurg) तालुक्यात अशीच एक झाडपडीची घटना घडल्याने एका महाविद्यालयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, रायगड (Raigad) जिल्ह्यात दरड कोसळल्याने एका कुटुंबाच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालक्यातील तळवडे गावात एका महाविद्यालयीन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तळवडे गावच्या जनता विद्यालयात 12 वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना वडाचे झाड पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायली धुरी ही तळवडे बाजार पेठेतील शाळेतून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या वडाचे झाड उन्मळून तिच्या अंगावर पडले. यावेळी विद्युत वाहिन्याही तुटून रस्त्यावर पडल्याचे नंतर निदर्शनास आले आहे. त्यामुळे सायलीचा मृत्यू नेमकं झाड पडून झाला की, विजेच्या वाहिन्यांना स्पर्श होऊन याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेनंतर स्थानिक प्रशासन व सायलीच्या नातेवाईकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामध्ये अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक डोंगरी भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी कोसळल्याने काही जमिनींचा भाग हा जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येते. त्यातूनच, जीर्ण झालेल्या जमिनींमुळे अनेक गावात दरड कोसळण्याची संभावना जिल्हा प्रशासनाने वर्तवली होती. त्यानंतर आज सकाळी सुरु असलेल्या पावसामध्ये महाड तालुक्यातल्या दासगाव मोहल्ला परिसरात एक घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीसोबत आलेला भला मोठा दगड घराच्या मागच्या बाजुने आल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, घरातील अनेक भिंतींना तडे देखील गेले आहेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराच मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने घराच्या मालकांस मोठा आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा
Video: 'सुवर्ण'संधी... सोने मुंबईत 5 हजार, पुणे, जळगावात 3 हजाराने स्वस्त, तुमच्या शहरातील दर किती?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
