Vishwas Patil VIDEO : एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला ही मोठी गोष्ट; विश्वास पाटलांचे वक्तव्य
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : आपण तमाशाच्या किंवा उसाच्या फडातील पाटील नसून शब्दाच्या फडातील पाटील असल्याचं विश्वास पाटील म्हणाले.

सातारा : साहित्य संमेलनासाठी एका पाटलाला अध्यक्ष करा अशी मागणी कुलकर्णी-जोशींनी केली. बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते असं वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी केलं. तसेच विश्वास पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही कौतुक केलं, साताऱ्याची गौरवगाथा मांडली. साताऱ्यात सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
साहित्य संमेलन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो तर तो आचार विचाराची आणि देशाला दिशा देण्याचा कार्यक्रम असतो. काँग्रेसची स्थापना होण्याआधीही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाल्याचं विश्वास पाटलांनी नमूद केलं. एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला ही मोठी गोष्ट असल्याचं विश्वास पाटील म्हणाले.
Vishwas Patil Speech : काय म्हणाले विश्वास पाटील?
उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, "पाटील म्हटलं की तीन फड आठवतात ते म्हणजे कुस्तीचा फड, तमाशाचा फड आणि उसाचा फड. पण हा पाटील शब्दाच्या फडातला पाटील आहे. 99 व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी आणि कुलकर्णींनी केली. बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. ही आपली जुनी वहिवाट आहे."
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : सावकरांचा किस्सा
विश्वास पाटील यांनी एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "87 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असे सावरकर म्हणाले होते, ते वाक्य फार गाजले होते. पण त्यांनी पुढं जाऊन सांगितले की मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे. त्यावेळी माय मराठीचा पुरस्कार त्यांनी केला. ज्या ज्या वेळी मराठी भाषेवर संकट येतं त्यावेळी आम्ही साहित्यिक लढा देतो."
नेहरू पंतप्रधान असताना मजनू सुलतानपुरी यांनी त्यांच्यावर टीका केल्याने त्यांना दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला होता. त्यावेळी मोरारजी देसाई यांनी मध्यस्थी केली आणि म्हणाले माफी मागा. त्यावेळी मजनू सुलतानापुरी यांनी मात्र त्यास नकार दिला, झुकायला नकार दिला. हा किस्सा विश्वास पाटील यांनी सांगितला.
सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आहे. तुमची आचार संहिता असेल तर आमची विचार संहिता आहे. तुमच्या आचारसंहितेचा काळ हा दोन-तीन आठवडे असतो. पण साहित्यकाची विचार संहिता ही अनेक पिढ्यांपर्यंत चालत असं विश्वास पाटील म्हणाले.
शेतकरी आत्महत्या करतात हे फक्त शासनाचं अपयश नाही तर समाजाचं देखील अपयश आहे असं मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा:























