Satara : सातारा लोकसभेसाठी जे लोक प्रयत्न करतात ते माझ्यासाठीच; उदयनराजेंचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत
Udayanraje Bhosale : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता.
सातारा: जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या (Satara Lok Sabha Election) भाजपच्या तिकिटासाठी जे मागणी करत आहेत ते माझ्यासाठीच प्रयत्न करत असल्याचा खा. मिश्किल टोला उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) लगावला. त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत सातारा मतदारसंघातून आपणच उमेदवार असल्याचे संकेत उदयनराजे यांनी दिल्याची चर्चा आहे.
खा. उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारी बाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, गेल्या लोकसभेच्या वेळी मला लोकांनी राजकीय आत्महत्या करताय असं सांगितलं होतं. अवघ्या तीन महिन्यात मी लोकसभेचा राजीनामा दिला. राजीनामा देणे म्हणजे तोंडचे काम नव्हते. कोणी निवडून आलेला सरपंचपदाचा राजीनामा देखील देताना विचार करतो. मात्र मी ज्या घराण्याचे नाव सांगतो त्या घराण्याच्या विचारांशी मी बांधील आहे. मी तत्त्व आणि विचार महत्त्वाचे मानतो. राष्ट्रवादीचे विचार पटत नव्हते म्हणूनच मी भाजपमध्ये आलो. जेव्हा जेव्हा मी माझे विचार मांडले त्यावेळी त्यावेळी मी घराचा आहेर देतोय असं सांगितले गेले. भाजपच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी आता जे प्रयत्न करतायेत, जे इच्छा व्यक्त करतात ते केवळ माझ्याच उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक
खासदार उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं. ते म्हणाले की, 'गरीबी हटाव, देश बचाओ' ही घोषणा सर्वांनी दिली. घोषणा देऊन फारसं काही होत नाही. मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वकर्मा योजना आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी राबवली जात आहे. विश्वकर्मा योजना ही दुर्लक्षित कारागीर आहेत त्यांच्या योगदानासाठी आहे. जे कारागीर आहेत त्यांना योग्य प्रवाहात आणून मार्केट उपलब्ध करून देण्याचे काम ही योजना करत आहे. या योजनेचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सहा रथ पाठवत आहोत, जेणेकरून याची माहिती लोकांना होऊ शकेल. कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये ही योजनेची मूळ संकल्पना आहे.
मी अनेक पंतप्रधान खूप जवळून पाहिले आहेत. मात्र मोदी अनेक काम आचरणात आणण्याचे काम करत आहेत. अनेकांनी मोदीच्या प्रवासावर टीका केली. पण अशा भेटीमुळे बाहेर देशातील संवाद वाढतो. यामुळे अनेक देशातील लोक आपल्याला जोडले गेले आहेत.
पहिल्या काळात खेळांमध्ये राजकारण होते. आता कुठल्याही प्रकारचा राजकारण नाही. सर्वधर्म समभावाची संबंधित प्रत्येक जाती धर्माचा आदर केला जातो. अनेकांनी मदत केले पण आज राम मंदिराचे काम पूर्ण झालेच ना. आज या देशाला मोदींच्या रूपाने चांगले नेतृत्व मिळाले, त्यांना दीर्घायुष्य लाभो.
मोदी यांची ज्यावेळेस मी भेट घेतली त्यावेळेस मराठा आरक्षणाविषयी बोललो. पण ते म्हणाले आपण सर्वांना आरक्षण कसे देऊ शकतो? पण मी त्यांना सारथी संस्थेसाठी फंड मिळावा ही विनंती केली असं उदयनराजे म्हणाले.
ही बातमी वाचा: