माढ्यात नेम चुकला, पण साताऱ्यात गेम करणार? शरद पवार मोठा डाव टाकण्याचा तयारीत! निरोप पोहोचवल्याने उत्सुकता वाढली
सातारमधून उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.
सातारा : बारामती (Baramati) आणि माढा (Madha) लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे प्राबल्य लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रासपचे महादेव जानकर यांना माढातून लढवण्याची ऑफर दिली होती. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीतून एक जागा त्यांना सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, महायुतीने मोठी खेळी करताना त्यांची नाराजी दूर करत आपल्या गोटात पुन्हा सामील करून घेतले. परभणीची जागा महादेव जानकर यांना जाहीर करण्यात आली असून त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा अजित पवार यांच्या कोट्यातून त्यांना देण्यात आली आहे.
सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर
या सर्व पार्श्वभूमीवर आता सातारामध्ये सुद्धा शरद पवार मोठी खेळी करण्याची तयारीत आहेत. याठिकाणी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ लढत करण्यासाठी शरद पवार यांनी तगड्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे जागा राष्ट्रवादीकडे असूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव समोर आलं आहे.
जयंत पाटलांनी घरी जाऊन घेतली भेट
काल (31 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उभयन नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. जवळपास तासभर झालेल्या चर्चेचा तपशील समोर आला नव्हता. मात्र, या चर्चेमध्ये सातारा आणि सांगलीच्या जागेचा समावेश होता.
पृथ्वीराज चव्हाण उतरल्यास भाजपसमोर तगडे आव्हान
सातारमधून उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली आहे की नाही? याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पृथ्वीराज चव्हाण सातारच्या रिंगणात उतरल्यास उदयनराजे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार यामध्ये शंका नाही. स्वच्छ प्रतिमा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्याने पृथ्वीराज चव्हाण सातारसाठी हुकमी एक्का ठरु शकतो.
पृथ्वीराज चव्हाण यांनी 1990 च्या दशकात संसदेत साताऱ्याचे प्रतिनिधीत्व केले होते. परंतु, शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर 1999 मध्ये श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने साताऱ्यातून उमेदवार उभे केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या