Prithviraj Chavan : पवारवाडी-नांदगावमधील पाझर तलाव वाढवण्याची गरज; आमदार पृथ्वीराज चव्हाणांकडून वनविभाग व जलसंधारण विभागासोबत पाहणी
Prithviraj Chavan : नांदगांव पवारवाडी याठिकाणी वनहद्दीमध्ये असलेल्या जुन्या व अत्यंत महत्वाच्या पाझर तलावाची पाहणी यावेळी कराड दक्षिणचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कराड (जि. सातारा) : कराड दक्षिण मतदारसंघातील पवारवाडी-नांदगाव येथील पाझर तलाव वाढवण्याची गरज आहे व यामुळे या भागातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकेल त्यामुळे वाढीव पाझर तलावासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केले. नांदगांव पवारवाडी याठिकाणी वनहद्दीमध्ये असलेल्या जुन्या व अत्यंत महत्वाच्या पाझर तलावाची पाहणी यावेळी कराड दक्षिणचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वनविभाग व जलसंधारण विभाग यांचे अधिकाऱ्यांसमवेत दौरा केला. यावेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तलावाच्या संपूर्ण रचनेची माहिती घेतली.
तलावाची उंची वाढवणे, जुनी भिंत पूर्णपणे काढून नवीन भिंत बांधणे यासाठी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. परंतु ते पाणी थांबत नाही योग्य ती साठवणूक न केल्याने दुष्काळात त्याची जाणीव होते. यामुळे काही गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जातो.
शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकेल
ते पुढे म्हणाले की, पवारवाडी नांदगावमध्ये 1972 साली बांधण्यात आलेल्या पाझर तलावाची पाहणी केली. त्या तलावामध्ये कितीही पाऊस पडला तरी यामधील पाणी टिकत नाही. सर्व पाणी पाझरून निघून जाते व यामुळे या तलावाच्या खाली असलेले पवारवाडी व नांदगाव या गावांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. 1972 च्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी दहा मीटर उंचीचा बंधारा बांधण्यात आलेला होता. त्याऐवजी आणखी उंच म्हणजे 13 ते 14 मीटर उंचीचा बंधारा बांधला तर 50 ते 60 टक्के अधिकचा पाणीसाठा होऊ शकेल. या बंधाऱ्यातून जे पाणी पाझरत आहे ते जर थांबवता आले व आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने बंधारा बांधला तर साठलेले पाणी उन्हाळ्यापर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकेल.
नवीन विस्तारित तलाव केला तर 25 एकर वनखात्याची जमीन पाण्याखाली जाईल व त्यास निर्वनीकरण करावे लागेल. जितकी जमीन पाण्यासाठी जाईल तितकीच जमीन झाडें लावण्यासाठी द्यावी लागणार आहे. तसेच त्याचा खर्च सुद्धा द्यावा लागेल. जो बंधारा नवीन बांधला जाणार आहे त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक काही दिवसात तयार केले जाईल. याबाबत माझी वनखात्याच्या व जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. हा वाढीव तलाव झाला तर या खालील सर्व गावांना वरदान ठरणार आहे. तसेच डोंगरावरील वन्यजीव पाण्याच्या शोधात गावात न जाता त्यांना इथेच पाणी मिळेल. वनतळ्याबाबत नियम शिथिल करण्याची गरज आहे. नांदगाव च्या पाझर तलावाचा विस्तार होऊन मोठा पाणीसाठा होईल अशी परिस्थिती दिसत आहे. याबाबत माझा पाठपुरावा राहील. अशी माहिती यावेळी आ. चव्हाण यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या