Satara News : कास पठारचा मोह आवरला नाही, घरी यायला उशीर झाला, कारण सांगितलं अपहरणाचं
Satara News : साताऱ्यातील महाविद्यालयीन तरुणी कास पठार पाहायला गेली होती. तिला घरी यायला उशीर झाला. भीतीमुळे तिने कुटुंबियांना आपलं अपहरण झालं होतं असं खोटं कारण सांगितलं.
Satara News : साताऱ्यात (Satara) महाविद्यालयात शिकणाऱ्या आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार करण्यासाठी कुटुंबीय सातारा शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी तपास सुरु केला. चौकशी केली. यानंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलीसही चक्रावले आणि कुटुंबियांना देखील धक्का बसला. चार तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी या घटनेतील मोठा उलगडा केला. ही तरुणी कास पठार (Kaas Pathar) पाहायला गेली होती. तिला घरी यायला उशीर झाला. आई वडील ओरडतील या भीतीमुळे तिने कुटुंबियांना आपलं अपहरण झालं होतं असं खोटं कारण सांगितलं. यानंतर स्वत:च्याच अपहरणाची कहाणी रचून कुटुंबियाना खोटं कारण सांगणाऱ्या तरुणीला पोलिसांनी समज देऊन सोडलं.
नेमकं काय घडलं?
फुलांची ख्याती सांगणाऱ्या कास पठार पहाणाऱ्यांचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. सध्या या कास पठारचा बहर आला असून अनेक जण या पठारावर जातात. साताऱ्यातील अशाच एका महाविद्यालयीन युवतीला हा मोह आवरला नाही आणि तिने महाविद्यालयातून थेट कास पठार गाठलं. ही तरुणी फुलांच्या एवढं मोहात पडली की आपल्याला उशीर झाला आहे, घरी आपली काळजी करत असतील याचं भानही तिला राहिलं नाही. घरी आली तेव्हा खूपच उशीर झाला होता. घरात काय कारण सांगायचं म्हणून तिने थेट अपहरणाचाच बनाव केला. "कॉलेजमधून सुटल्यावर मी घरी येत असताना एक ओमनी कार आली आणि त्या कारमधून मला पकडून नेहले. मी त्यांच्या तावडीतून सुटले आणि घरी आले," असं तिने कुटुंबियांना सांगितलं. हे ऐकल्यावर सर्वजण घाबरले. कुटुंबीयांनी त्या युवतीला घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांची पथकं साताऱ्यात फिरु लागली. गाडी सापडत नव्हती. ज्या परिसरातून तिला नेले त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज तपासत असताना ती गाडी तिने सांगितलेल्या वेळेनुसार तिथून गेलीच नसल्याचं समोर आलं. इतकंच काय तर ती मुलगीही त्या ठिकाणाहून त्या वेळेत गेली नव्हती. अखेर पोलिसांनी तिची उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली आणि हे सर्व सत्य बाहेर पडले. तिने रचलेला हा बनाव पोलीस डायरी किंवा क्राईम पेट्रोल यांसारख्या मालिकांमधून डोक्यात आल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्या मुलीला चांगलीच समज दिली आणि सोडून दिलं.
निसर्गरम्य कास पठार
सहयाद्री पर्वतराजीत सातारा शहरापासून 25 किमी अंतरावर निसर्गरम्य असे कास पठार आहे. या पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात रंगांचा बहर जवळपास 10 चौरस किमीमध्ये पाहायला मिळतो. 850 वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे विविध प्रकारची फुलपाखरे देखील बागडतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुलांच्या रोपांचे चक्र वाढत असल्याने पठार दर 15 ते 20 दिवसांनी रंग बदलत असल्याचे दिसते. वनस्पती विज्ञानासाठी अजूनही नवीन असलेल्या अनेक जाती पठारावर आढळतात. तसेच अनेक स्थानिक आणि लुप्त होत चालेल्या वनस्पती सुद्धा इथे आढळून येतात. कास पठार हे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासात भविष्यातील संशोधनासाठी उपयोगी ठरेल. गेल्या 4 ते 5 वर्षात हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करत आहे. कास पठाराला हंगामात दररोज तीन हजार पेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर सौंदर्याने अतिशय बहरलेला दिसतो. या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामनोली इथे कोयनेचा जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला अशी विविध पर्यटन स्थळे आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Mumbai News : शाळेत जायचं नाही म्हणून रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, पोलिसांची तारांबळ