बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
वन विभागाने कराड तालुक्यात बसवलेल्या ए.आय. सिस्टीममुळे बिबट्या आला की 120 डेसिबलचा सायरन वाजणार आहे.

सातारा : राज्यातील काही जिल्ह्यात बिबट्या (Leopard) या वन्य प्राण्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्री कुणाच्या घरात, तर दिवसाच कुणाच्या तरी बांधावर बिबट्याचा वावर गेल्या काही महिन्यात दिसून आलाय. त्यामुळे, ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. सोलापूर, धाराशिव, सातारा, नाशिक, पुणे जिल्ह्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सातारा (Satara) वन विभागाने एक आयडिया लढवली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळला जावा या हेतूने सातारा वन विभागाने कराड तालुक्यातील उंडाळे येथे ए.आय. लेफर्ड डीटेक्शन सिस्टिम बसवली आहे.
वन विभागाने कराड तालुक्यात बसवलेल्या ए.आय. सिस्टीममुळे बिबट्या आला की 120 डेसिबलचा सायरन वाजणार आहे. त्यामुळे, आता गावातील लोकांना बिबट्या नेमका कुठे आहे? हे कळणार असून सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. कराड तालुक्यातील उंडाळे गावासह परिसरात बिबट्यासह वन्य प्राण्याचा वावर वारंवार दिसून येत आहे. शेतकऱ्यांसह शाळा कॉलेजच्या मुलांचा वावर जास्त असलेल्या क्षेत्रामध्ये वनविभागाने ए.आय. लेफर्ड सिस्टम लोकांच्या मागणीवरून बसवली आहे. गेल्या दीड वर्षात बिबट्याने अनेकांवर हल्ले केलेबाहेत. आता बिबट्या आल्याचे समजणार असल्याने ग्रामस्थांसाठी ही आनंदाची बातमी आहे, असे येथील गावचे उपसरपंच बापुराव पाटील यांनी म्हटले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात 2 चिमकुल्यांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 लहानग्या मुलांचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडल्या आहेत. बिबट्याने घराच्या ओट्यावरून हल्ला करून उचलून नेलेल्या चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह तब्बल 19 तासांच्या शोधकार्यानंतर सापडला. महिनाभरात दोन बालकांचा बिबट्याने बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. अवघ्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर नावाच्या चिमुकल्याला त्याच्या घराच्या ओट्यावरून नरभक्षक बिबट्याने हल्ला करून उचलून नेले होते. या घटनेने संपूर्ण वडनेर परिसरात भीती आणि दहशत पसरली आहे. लष्कराचे जवान आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून श्रुतिकचा शोध घेतला जात होता.


















