Poladpur-Mahableshwar Road : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद
Poladpur-Mahableshwar Road : प्रतापगड फाटा ते मेटतळे घाट दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या एक दिवस बंद राहणार आहे.
Satara News : पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरुन (Poladpur Mahabaleshwar Road) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पार फाटा ते मेटतळे घाट दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट (Ambenali Ghat) एक दिवस बंद राहणार आहे. रस्त्याच्या कामासाठी इथली वाहतूक बुधवारी (4 जानेवारी) सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान बंद राहिल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
अतिवृष्टीमुळे रस्त्याचं मोठं नुकसान
महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता खराब झाला होता. रस्ते, घाट, पूल, शेती, घरे, जनावरं यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे तसेच नदीपात्रातून, ओढ्यांच्या पात्रांतून मोठ्या प्रमाणात दगड-माती रस्त्यावर येऊन जागोजागी मोऱ्यांची आणि रस्त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. रस्ता वाहून जाणे, पुल वाहून जाणे अशाप्रकारचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे अतिवृष्टीमुळे दूरवस्था झालेल्या रस्त्याचं काम आज दिवसभरात होणार आहे.
कोकणातून महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची अडचण
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, पार फाटा ते मेटतळे घाट दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे आंबेनळी घाटातील रस्ता बुधवारी एक दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कामामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे कोकणातून महाबळेश्वरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या पर्यटकांची मात्र मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
मागील वर्षी 14 जुलैलाही रस्ता बंद
अतिवृष्टीमुळे याठिकाणचा रस्ता अतिशय खराब झाला होता. त्यामुळे इथे सध्या दुरुस्तीची कामं सुरु आहेत. याआधी 20 जून रोजी पोलादपूर-महाबळेश्वर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे या दरम्यानचा घाटरस्ता आणि कुंभरोशी इथून पारफाटा ते देवळी हा रस्ता असे दोन रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. तर त्यानंतर 14 जुलै रोजी दुरुस्तीच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. पाईप टाकणे आणि ओढ्याच्या पात्रातील दगड-धोंडे काढणं, तसंच डोंगर भागाकडील सुटलेला दगड-मातीचा भाग काढण्यासाठी 14 जुलै रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता.