बीडचा वणवा राज्यभरात पसरणार, वाल्मिक कराड गोत्यात येणार? मुंबई, बीडसह प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघण्याची शक्यता
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील आता या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे.
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील आता या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. बीडमधे झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील लालबागमध्ये मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तसेच या हत्येच्या प्रकरणात येत्या 28 तारखेला बीडमधे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी होणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, बीड घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईतील लालबाग मधे आंदोलनाला सुरुवात होतेय. आजच्या या मोर्च्यातून वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना अटक करा, अशी आंदोलकांची मागणी आहे. बीडला होणाऱ्या मोर्चा पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर मुंबईत देखील मोर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीडचा वणवा आता राज्यभरात पसरणार असल्याचे बोलले जात आहे.
बीडच्या घटनेचा वणवा राज्यभरात पसरणार?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील दहशत आणि बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा समोर आला असून बीडचा बिहार होत असल्याची टीकाही केली जात आहे. राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही बीडसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच, मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला होता.त्यानंतर आता बीडमध्ये पोलीस ॲक्शन मोडवर आली असून हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशमुखांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी मारेकर्याला फाशी द्या - बजरंग सोनवणे
तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देवू नये. संतोष देशमुख सारख्या सोज्वळ मुलाच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्या मारेकर्याला फाशीची शिक्षा द्या, हीच माझ्यासह, माझ्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावं, हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्ष त्याबाबत निर्णय घेतील. मात्र खरंच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजित दादा यांच्या राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे अजित दादांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावं आणि या प्रकारणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी ही मागणी केली आहे.
हे ही वाचा