Vishwajeet Kadam : भाजप प्रवेशावरून सुरु असलेल्या चर्चेवर विश्वजित कदम काय म्हणाले?
काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना भाजप प्रवेशाच्या ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजीत कदम यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
Vishwajeet Kadam : काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना भाजप प्रवेशाच्या ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. पतंगराव कदम यांचे पुत्र आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजीत कदम यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र, या चर्चेला आज त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पलुस तालुक्यातील अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना विश्वजित कदम यांनी भाजपकडून मिळालेल्या पक्ष प्रवेशाच्या ऑफरच्या चर्चेबाबत खुलासा केला. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात होते.
विश्वजित कदम म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून चुकीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. का माझ्यावर एवढा फोकस आहे हे मला कळत नाही, कदाचित जास्त प्रेम माझ्यावर असू शकेल. मी कोणत्याही वेगळ्या भूमिकेत नाही, विचारात नाही. पतंगराव आणि मोहन कदमांच्या वारसांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. काँग्रेसच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी निश्चित राहावे. तत्पूर्वी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही आणि सोनिया गांधी यांनी राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आपल्या नेतृत्वात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली.
अडीच वर्षातील दीड वर्षाचा काळ कोरोनामध्ये गेला, पण तुमच्या नेतृत्वात शिकायला मिळाले, काम करण्यासाठी संधी मिळाली अपघाताने आपलं सरकार गेलं असलं तरी पुढ आपलं सरकार येईल, आपण शेतकरी तसेच गावकऱ्यांच्या विकासासाठी तत्पर राहू असेही विश्वजित कदम म्हणाले.
बिलंदर गडी म्हणत विश्वजित कदमांना वडिलकीचा सल्ला
काँग्रेस पक्षासाठी अडचणीचा काळ आहे, पण अडचणीचा काळ येत असतो आणि जात असतो. या अडचणीच्या काळातच तावून-सुलाखून नेतृत्व तयार होत असते, असे सूचक वक्तव्य करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विश्वजित कदम यांना वडिलकीचा सल्ला दिला.
थोरात पुढे म्हणाले की, पतंगराव कदम गेल्यानंतर विश्वजित कदम यांना सांभाळून घ्यावे लागेल असे वाटत होतं. मात्र, आता विश्वजितच सगळ्यांना सांभाळत आहे. गडी एकदम बिलंदर आहे. काँग्रेसचा विचार, नेतृत्व पुढे घेऊन नेण्याची जबाबदारी आता विश्वजितवर आहे. विश्वजित कदम यांचा भविष्यकाळ काँग्रेसमध्ये घडेल. तो दुसरीकडे कोठेह घडणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या