Vishwajeet kadam on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले तुझा मुहूर्त लावतो, आता त्या मुहूर्ताचा विश्वजित कदमांनीच केला खुलासा!
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कृष्णा नदीवरील बुर्ली-सुर्यगाव पुलाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित समारंभात बोलताना कदम यांनी त्या मुहूर्तावरून स्पष्टीकरण दिले.
सांगली : गेल्या काही दिवसांपासून पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet kadam) भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. ही चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित कदमांना थेट मुहूर्त लावतो, या केलेल्या वक्तव्यावरून चांगलीच चर्चा रंगली आणि अखेर या मुहूर्ताचा माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सांगलीमध्ये खुलासा केला.
आयुष्यात केवळ आत्तापर्यंत तीन मुहूर्त आले
आपल्या आयुष्यात केवळ आत्तापर्यंत तीन मुहूर्त आले, पहिला पतंगराव कदम व विजयमाला कदम यांच्या पोटी जन्माला आल्यावर, दुसरा पत्नी स्वप्नालीशी लग्न आणि तिसरा 2014 पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 63 हजार मतांनी निवडून दिले, हे तीनच मुहूर्त आतापर्यंत महत्वाचे आहेत. 2024 ला चौथा मुहूर्त असेल, पण आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट मतदारसंघातील टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याबाबत मागत होतो आणि या कामाबाबतीत ठरलेल्या बैठका झाल्या नव्हत्या. यातून देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने बैठकांच्या बाबतीत मुहूर्त लावण्याचा ते वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यावरून महाराष्ट्रात आणि अगदी मतदारसंघात देखील चुकीच्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न झाला. आपण कोणाला घाबरत नाही, असे देखील विश्वजित कदमांनी स्पष्ट केले.
सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली या ठिकाणी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कृष्णा नदीवरील बुर्ली-सुर्यगाव पुलाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित समारंभात बोलताना कदम यांनी त्या मुहूर्तावरून स्पष्टीकरण दिले.
गावांना पाणी देण्यासाठी दिल्लीला विचारणार आहे का? विश्वजित कदम
दरम्यान, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे सर्व आदेश दिल्लीवरून येत आहेत, त्यामुळे गावांना पाणी देण्यासाठी आता दिल्लीला विचारणार आहे का? असा खडा सवाल काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी राज्य सरकारला केला. महाराष्ट्रातील पोलीस भरती देखील दिल्लीकरांना विचारल्याशिवाय होणार नाही, अशी परिस्थिती आहे. पाण्याबाबतीत दिल्लीला विचारु नका, असेही विश्वजित कदमांनी राज्य सरकारला सुनावलं. सांगलीमध्ये जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्चा प्रसंगी ते बोलत होते. पाणी नियोजनाबाबतीत लवकर पाऊले उचलावीत अन्यथा राज्य सरकारला रस्त्यावर उतरून धारेवर धरू, असा इशारा देखील यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या