(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis: विधिमंडळाबाहेर देवेंद्र फडणवीस- विश्वजीत कदमांची भेट, विकासकामांबाबत चर्चा
Vishwajeet Kadam: विधिमंडळाबाहेर देवेंद्र फडणवीस- विश्वजीत कदमांची भेट, विकासकामांबाबत चर्चा
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला. अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये विकासकामाच्या प्रकल्पाबाबत चर्चा झाली. एका पाटबंधारे प्रकल्पाबाबत ही चर्चा असल्याचे समजते.
राज्य विधिमंडळाच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवट झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज संपवून विधिमंडळ परिसराच्या बाहेर पडत होते. त्यांच्या अवतीभोवती नेहमीप्रमाणे भाजप आमदारांचा जत्था होता. हे आमदार फडणवीसांशी बोलत होते. त्याचवेळी मागच्या घोळक्यातून वाट काढत विश्वजीत कदम पुढे आले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न केला. फडणवीस घाईत असल्यामुळे पुढे चालत राहिले. तेव्हा विश्वजीत कदम यांनी झटकन त्यांच्या बाजूला येत बोलायला सुरुवात केली. या दोघांमध्ये काही चर्चा झाली. त्यावेळी फडणवीसांच्या एका वाक्यावर विश्वजीत कदम यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पुढील काहीवेळ दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरु होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस निघून गेले.
अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी
अधिवेशनाचा शेवटचा दिवस अत्यंत वादळी ठरला. सत्ताधारी शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत खडाजंगी झाली. यावेळी दोन्ही नेते एकमेकांवर धावून गेल्याचे सांगितले जाते. अखेर भरत गोगावले आणि शंभुराज देसाई यांनी मध्ये पडत हा वाद सोडवला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून असा कोणताही वाद झाल्याचे नाकारण्यात आले. परंतु, आज दिवसभर राजकीय वर्तुळात याच घटनेची चर्चा होती.
आणखी वाचा
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला : देवेंद्र फडणवीस
ड्रग्ज फ्री महाराष्ट्र मोहीम राबवत आहोत, पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस