India China News : भारत आणि चीन दरम्यान 5 वर्षानंतर थेट विमानसेवा सुरु होणार, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार
India China News: भारत आणि चीन दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली थेट विमान सेवा पुन्हा सुरु होणार आहे. यामुळं दोन्ही देशांमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल.

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात ऑक्टोबर 2025 अखेर थेट विमान सुरु करण्यावर सहमती झाली आहे. भारत आणि चीनच्या नागरी उड्डयण प्राधिकरणामध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यासाठी एक संशोधित विमान सेवा करारावर चर्चा सुरु आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विमान सेवा सुरु होणार आहे. हा भारत सरकारच्या दोन्ही देशांचे संबंध सामान्य करणाऱ्या धोरणाचा परिणाम आहे.
थेट विमानसेवा ऑक्टोबरपासून सुरु
विदेश मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दोन्ही देशांच्या चर्चांनुसार भारत आणि चीनमधील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारी थेट विमानसेवा ऑक्टोबर 2025 पासून सुरु होऊ शकते. हिवाळ्यातील वातावरणाचा विचार करुन दोन्ही देशांमधील नामांकित एअरलाईन्स व्यावसायिक निर्णय आणि विमान सेवा सुरु करण्यासाठी निकषांचा विचार करुन ठरवतील.
भारत आणि चीन यांच्यातील संपर्क वाढणार : विदेश मंत्रालय
भारत आणि चीनच्या नागरी विमान उड्डयण प्राधिकरणांमधील या करारामुळं भारत आणि चीनमधील लोकांमधील संपर्क वाढेल. यामुळं द्वीपक्षीय आदान-प्रदान हळू हळू सामान्य व्हायला मदत मिळेल.
गेल्या महिन्यात शांघाई सहयोग संघटनेच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. त्या बैठकीत द्वीपक्षीय संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा झाली होती.
एलएसीवरील गस्तीच्या नियमांवर सहमती
दोन्ही देशांनी 3500 किलोमीटर लांबीच्या लाईन ऑफ कंट्रोलवरील गस्तीच्या नियमांवर सहमती झाली आहे. ज्यामुळं चार वर्ष जुन्या सीमा वाद कमी झाला आहे. विदेश मंत्रालयानं नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी झालेल्या करार आणि सीमेवर शांतता राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं.
भारत आणि चीनच्या नेत्यांमध्ये चर्चा
नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांनी या महिन्याच्या सुरुवातीला विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचं समर्थन करण्याबाबत सहमती दर्शवली. सप्टेंबरमध्ये चीनचे विदेश मंत्री वांग यी यांनी भारताचा दौरा केला होता. सीमेच्या मुद्यावर विशेष प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. त्यांनी राष्ट्री सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी भारत आणि चीन यांच्यातील संबंध स्थिर ठेवण्याबाबत चर्चा झाली होती.






















