(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News: सांगली : पोहता येत नसतानाही रणरणत्या उन्हामुळे वारणा नदीत उतरले अन् दोन मावस भाऊ...
Sangli News: ही घटना सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे उघडकीस आली. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे पार्थिव आज सकाळी मालेवाडी जॅकवेलच्या ठिकाणी बचाव पथकाला मिळाले.
Sangli News: पोहता येत नसतानाही रणरणत्या उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी वारणा नदीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना आज (27 मे) शनिवारी सकाळी तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे उघडकीस आली. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे पार्थिव आज सकाळी मालेवाडी जॅकवेलच्या ठिकाणी बचाव पथकाला मिळाले.
अमोल प्रकाश सुतार (वय 16) व रविराज उत्तम सुतार (वय 12) ही नात्याने मावस भाऊ असलेली दोन शाळकरी मुलं वैरण काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी वारणाकाठी असलेल्या शेतात गेली होती. सायंकाळपर्यंत मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी शोध घेतला असता नदीकाठी चप्पल, कपडे आणि भ्रमणध्वनी या वस्तू आढळून आल्या. यामुळे मुलं नदीत उतरली असतील या शक्यतेने शोध सुरू केला. मात्र, अंधार पडल्याने शोध थांबविण्यात आला.
पाण्याचा अंदाज न आल्याने मुलांचा बुडून मृत्यू
आज सकाळी पुन्हा मुलांचा शोध बचाव पथकामार्फत सुरू करण्यात आला. यावेळी बचाव पथकाला मालेवाडी जॅकवेल नजीक दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. याबाबत कुरळप पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. रविराज सुतार हा मुळचा राजमाची (ता. कराड) येथील रहिवाशी असून उन्हाळी सुट्टीसाठी तो मावशीकडे तांदुळवाडीला आला होता. वाढत्या उन्हाच्या काहिलीने थंडाव्यासाठी दोन्ही मुले वारणा नदीपात्रात उतरली होती. दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांचा बुडून मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दिपक लांडगे या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा एका मांत्रिकाच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. मांत्रिकाच्या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
आर्यनला सतत ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून आर्यनला एका नातेवाईक महिलेने आर्यनला कर्नाटकातील कुडचीजवळ शिरगूर या गावातील एका मांत्रिकाकडे उपचारासाठी नेले होते. त्या मांत्रिकाने मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही म्हणत अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या