Sangli Rain Update : चांदोली धरण क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पावसाने शेकडो एकरातील भात पिक मातीमोल
आज वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसचा जोर कमी झाल्याने वारणा धरणातून सुरु असलेला 3465 क्युसेक विसर्ग कमी करुन फक्त विद्युत जनित्रमधून 1465 क्युसेक विसर्ग नदी पत्रात सोडण्यात येत आहे.
वारणावती (जि. सांगली) : सांगलीच्या (Sangli News) शिराळा (Shirala) तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पावसाने धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग करण्याची वेळ रविवारी संध्याकाळी आली. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने वारणा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील निवाळी व धनगरवाडा परिसरात हा ढगफुटीसदृश पाऊस झाला.
धरणाचे चारही दरवाजे बंद
एकूण 299 मिली मीटर इतक्या पावसाची नोंद याठिकाणी झाली. आधीच चांदोली धरण शंभर टक्के भरले असून चांदोली धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, आज वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसचा जोर कमी झाल्याने वारणा धरणातून सुरु असलेला 3465 क्युसेक विसर्ग कमी करुन फक्त विद्युत जनित्रमधून 1465 क्युसेक विसर्ग नदी पत्रात सोडण्यात येत आहे. आज पूर्ण पावसाने विश्रांती घेतल्याने सायंकाळी सहा वाजता चारही दरवाजे बंद करण्यात आले.
पावसाने शेकडो एकरातील भात पिकाचे नुकसान
शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाने सुरुवात केल्यानंतर मणदूर, सोनवडे, आरळा तसेच परिसरातील वाड्यांना अक्षरशः पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने नाल्यांमध्ये पाणीच पाणी झाले. शेती शिवारे तुडुंब झाली आहे. या पावसाने शेकडो एकरातील भात पिकाचे नुकसान केलं आहे. मणदूरमधील येथील ओढ्याचे पाणी भात शेतीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दुसरीकडे, मांगले परिसरात सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लागली. रविवारी दिवसभर पावसाने असंत घेतली नाही. त्यामुळे उत्तर भागातील करमाळे, बांबवडे परिसरातही दिवसभर पाऊस झाला. पोटरी आलेलं भात पीक, सोयाबीन, भुईमूग पिकासाठी परतीचा पाऊस आता मारक ठरू लागला आहे. वातावरणातील बदलाने सुद्धा परिसरातील नागरिक तापाने बेजार झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या