Sangli Police: टेलिग्राम ग्रुपमधून ऑनलाईन फसवणूक; 21 लाखांचा शोध घेताना तब्बल 27 खात्यांमध्ये सापडली आठ कोटींवर रक्कम
खाती ज्यांच्या नावे आहेत ते सामान्य लोक असून त्यांनाही या व्यवहाराची माहिती नाही. मुख्य टोळी अद्याप उघडकीस आलेली नसली, तरी संशयास्पद 27 खात्यावर जमा असलेली 7 कोटी 81 लाखाची रक्कम गोठवण्यात आली आहे.
सांगली पोलिस: ऑनलाईन ट्रेडिंगनंतर फायद्याचे आमिष दाखवून बनावट बँक खात्याच्या माध्यमातून फसवण्याचा प्रकार सांगली पोलिसांनी (Sangli Police) उघडकीस आणला आहे. या माध्यमातून गंडा घालण्यासाठी बनावट खात्यावर जमा झालेली 7 कोटी 81 लाखाची रक्कम गोठवण्यात आली आहे. इस्लामपूरमधील हर्षवर्धन पाटील यांनी 21 लाख 10 हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. संशयितांनी कॅपिटलिक्स ऑनलाईन टेलीग्राम ग्रुपवरुन संवाद साधून अधिक फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. यासाठी बँक खाते नंबर देण्यात आला. परताव्यासाठी करापोटी आणखी पैसे जमा करण्यासाठी वेगवेगळे खाते नंबर चॅटिंगद्वारे देण्यात आले.
या प्रकरणी तक्रार दाखल होताच उप विभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, इस्लामपूर व सायबर पोलीस यांनी संयुक्त तपास केला. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. विविध बँकेत 27 बनावट खाती काढून फसवणुकीचा फंडा वापरण्यात येत असल्याचे समोर आले. खाती ज्यांच्या नावे आहेत ते सामान्य लोक असून त्यांनाही या व्यवहाराची माहिती नाही. यामधील मुख्य टोळी अद्याप उघडकीस आलेली नसली, तरी संशयास्पद 27 खात्यावर जमा असलेली 7 कोटी 81 लाखाची रक्कम गोठवण्यात आली आहे.
सांगलीच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास
फिर्याद दाखल झाल्यानंतर सांगली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तातडीने तांत्रिक दृष्ट्या सखोल तपास करून फसवणूक केलेल्या कंपनीच्या 27 वेगवेगळ्या बँक खाते आणि त्यातील सात कोटी 81 लाख गोठवल्याची माहिती सांगलीचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. सोशल मीडियावरून होणाऱ्या ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे ज्यादा पैसे मिळवण्याचे अमिष दाखवणाऱ्या टोळीपासून सावधान राहण्याचा आवाहन करत कॅपिटलएक्स टेलीग्राम ग्रुप व इतर टेलिग्रामवरून अशा प्रकारची जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सांगली सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक तेली यांनी केले आहे.
फसवणुकीचा प्रकार कसा उघडकीस आला?
इस्लामपुरातील हर्षवर्धन विश्वास पाटील या इसमाचे कॅपिटलएक्स ऑनलाईन टेलिग्राम ग्रुपवरून चॅटिंग करून दुप्पट पैशाचं अमिष दाखवत ऑनलाईन ट्रेडिंग करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पाटील यांना वेगवेगळे अकाउंट नंबर देऊन त्यात रक्कम गुंतवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पाटील यांनी 21 लाख 10 हजार रुपये गुंतवले. यानंतर आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या