Sangli News : द्राक्ष बागायतदारांना साडेतीन कोटींना गंडा घालणाऱ्या तीन व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुबईत द्राक्षं निर्यात करणार असल्याचे सांगून संबंधित व्यापाऱ्यांनी सुमारे 110 शेतकऱ्यांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
सांगली : सातारा (Satara News) आणि सांगली जिल्ह्यातील (Sangli News) विविध तालुक्यात तब्बल 110 द्राक्ष बागायतदारांना सुमारे साडेतीन कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या तीन द्राक्ष व्यापाऱ्यांना तासगाव पोलिसांनी जेरबंद केलं आहे. सलीम सरदार सय्यद (रा. नाशिक) गंगाराम सुखदेव चव्हाण (रा. ठाणे) आणि एजंट पशुपती रंगराव माळी (रा. सावर्डे) यांना अटक करण्यात आली आहे.
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची साक्ष घेतली जाणार
सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुबईत द्राक्षं निर्यात करणार असल्याचे सांगून संबंधित व्यापाऱ्यांनी सुमारे 110 शेतकऱ्यांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केली होती. वेगवेगळे पत्ते आणि खरेदीची ठिकाणे बदलून या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली होती. या व्यापाऱ्यांकडून जवळपास साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक विटा, पलूस, मायणी आणि तासगाव परिसरात झाल्याची माहिती आहे. याबाबत तासगाव पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची साक्ष घेतली जाणार आहे.
द्राक्ष व्यापाऱ्याचा कसून तपास
सांगली जिल्ह्यातील सावळज (ता. तासगाव) येथील द्राक्ष उत्पादक अंकुश माळी यांनी तासगाव पोलिसांकडे 21 ते 24 फेब्रुवारी 2023 या काळात सलीम सय्यद या व्यापाऱ्याने 9 लाख 23 हजार रुपयांची द्राक्षे खरेदी करून फसवणूक केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार तासगाव पोलिसांनी द्राक्ष व्यापाऱ्याचा कसून तपास केला होता. संबंधित व्यापारी सांगली, नाशिक, मुंबई अशा वेगवेगळ्या पत्त्यावर राहण्यासाठी होता. गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर अहमदनगर येथे सासरवाडीत सलीम सरदार सय्यद हा व्यापारी सापडला. त्याला अटक करून त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर इतर व्यापाऱ्यांची माहिती मिळाली. याच प्रकरणात द्राक्ष खरेदी करणारा मूळ सावर्डेमधील आणि सध्या दुबईत वास्तव्यास असणाऱ्या अधिक पवारवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या