Sangli News: कवलापूर विमानतळासाठी सांगलीकर पंतप्रधान मोदींना पाठवणार 50 हजार पत्रे; पत्र पाठवण्याच्या अभियानाची सांगलीतून सुरुवात
Sangli News: जिल्ह्यातील शेतीमालाला अन्य राज्याची बाजारपेठ मिळावी यासाठी कवलापूरमध्ये विमानतळ होणे फार गरजेचे आहे. यासाठी कवलापूर विमानतळ बचाव समितीकडून गेली अनेक वर्षे आंदोलन सुरू आहे.
Sangli News: सांगलीजवळील कवलापूरमध्ये विमानतळ व्हावे या वर्षानुवर्षेच्या मागणीसाठी विमानतळ बचाव समिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना 50 हजार विनंतीपत्रे पाठवणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज (19 जून) सांगलीच्या मारुती चौकातून करण्यात आला. कवलापूर येथील विमानतळाची जागा 50 वर्षांपासून विमानतळासाठी आरक्षित आहे. काही चार्टर्ड विमाने सुद्धा इथे उतरल्याची माहिती आहे.
सांगली जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा आणि जिल्ह्यातील शेतीमालाला अन्य राज्याची बाजारपेठ मिळावी यासाठी कवलापूरमध्ये विमानतळ होणे फार गरजेचे आहे. यासाठी कवलापूर विमानतळ बचाव समितीकडून गेली अनेक वर्षे आंदोलन सुरु आहे. आज याचाच एक भाग म्हणून विमानतळ व्हावे अशी विनंती करणारी 50 हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यामध्ये बचाव समितीचे निमंत्रक पै. पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, व्यापारी संघटनेचे अतुल शहा यांच्यासह बचाव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले. या अभियानांतर्गत मोदींना 50 हजार पत्रे पाठवत कवलापूर येथे विमानतळ सुरु करण्याबाबतची मागणी केली जाणार आहे. या अभियानाला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कवलापूर येथील 160 एकर जागेवर विमानतळ साकारले जाईल, हे स्वप्न पाहत जिल्ह्यातील एक पिढी म्हातारी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी हे स्वप्न भंग पावल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचवेळी ही जागा औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली. येथे औद्योगिक वसाहतीसाठी प्राथमिक चर्चा सुरु होत्या, मात्र त्याला मूर्त स्वरुप कधीच आले नव्हते.
उडान योजनेच्या यादीत कवलापूर विमानतळाचा उल्लेख
दुसरीकडे, केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या यादीत ‘बंद अवस्थेत’ असा कवलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. आयआयटीमध्ये कार्यरत स्वानंद बोडस यांनी माहिती अधिकारात दाखल अर्जातून ही बाब समोर आली आली आहे. त्यामुळे कवलापूर विमानतळ उभारणीला बळ आले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑक्टोबर 2016 मध्ये उडान योजना सुरु केली. त्याच्या यादीत कवलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. धावपटी नादुरुस्त असल्यामुळे बंद असलेले विमानतळ म्हणून कवलापूरचा उल्लेख आहे. उडान योजना अंतर्गत विमानतळ विकासासाठी चार फेऱ्या झाल्या. कवलापूर विमानतळ चालवण्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे विमानतळ पुनरुज्जीवन होऊ शकलेलं नाही. भविष्यात प्रस्ताव आल्यास पुनरुज्जीवन शक्य आहे, असे उत्तर माहिती अधिकारात देण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या