Sangli News: कृष्णा नदी पात्रात मगर आणि नदीत पोहणाऱ्या एका तरुणाचा आमने-सामने थरार
मगर व तरुण जवळ येताच थरारक दृष्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, डोळ्याचे पाते लवते न लवते एवढ्या काळात मगरीने डुबकी मारत तळ गाठला. तरुण काही घडलेच नाही असे समजून तीरावर आला.

सांगली : सांगलीमध्ये कृष्णा नदीपात्रात पोहणाऱ्या तरुणाचा आणि मगरीचा थरारक सामना आज (13 सप्टेंबर) पाहण्यास मिळाला. सुदैवाने पोहणारा तरुण जवळ येताच मगरीने तळ गाठल्याने बचावला. नदीत पोहण्यासाठी तरुण रोज असतात. मात्र, घाटाजवळ मोठमोठ्या मगरींचा अधिवास असल्याने पट्टीचे पोहणारे नेहमीच सावध असतात.
आजही (13 सप्टेंबर) नित्याप्रमाणे राजदीप कांबळे सांगलीवाडीच्या बाजूने बायपास पूलाकडून समर्थ घाटाकडे येत होता. याच दरम्यान सांगलीवाडीकडून महाकाय मगर संथ विहार करीत मध्यभागी येत होती. दोघेही एकमेकांकडे येत असल्याचे काठावरील नागरिकांना दिसत होते. पोहणाऱ्याला ओरडून, शिट्ट्या वाजवून सावध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पात्रात त्याला ऐकायला गेले नाही. मगर आणि तरुण जवळ येताच थरारक दृष्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, डोळ्याचे पाते लवते न लवते एवढ्या काळात मगरीने डुबकी मारत तळ गाठला. तरुण काही घडलेच नाही असे समजून तीरावर आला.
काठावर लोकांचा जोराने आवाज सुरु होता
दरम्यान, तरुणाची मगरीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याने काठावरून प्रचंड आरडाओरड सुरू होती. पात्राच्या दोन्ही टोकावरून आवाज कानी येत होता. मात्र, तरुणाने कानात एअर प्लग घालून पाण्यात मान खाली घालून पोहत असल्याने लोकांचा आवाज त्यांच्या कानावर पोहोचलाच नाही. तसेच समोरून अजस्त्र मगर येत आहे याचीही त्यांना माहिती नव्हती. पोहण्यात गुंग असतानाच जवळ येताच मगर पाण्यात खाली गेली. वरुन तरुण पोहत निघून गेल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला.
मगरींचा आणि बैलाचा थरारक पाठलाग
दरम्यान, पाच महिन्यांपूर्वीच सांगलीमध्येच भिलवडीमधील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये चक्क मगर आणि बैलाचा थरारक पाठलाग पाहायला मिळाला होता. नदीपात्रात शिरलेल्या बैलावर झडप टाकण्यासाठी मगरींचा झुंड मागावर होता. मात्र, या मगरींना नदीमध्येच बैलाने चकवा देत चार तास हा पाठ शिवणीचा खेळ सुरू ठेवला होता. अखेर बैलाच्या मालकाने आणि जिगरबाज नावाडी चालकांनी मगरीच्या तावडीत सापडण्याआधीच बैलाची कृष्णा नदीच्या पाण्यातून बाहेर काढून सुटका केल्याचा घटना घडली होती.
बैल पाण्यात उतरल्याचं कृष्णा नदीतील मगरींच्याही निदर्शनास आले होते. मगरीही या बैलाच्या आजूबाजूने घात लावून बसल्या होत्या. त्यांचा बैलाच्या दिशेने या मगरींचा पाठलाग सुरू झाला. बैल मगरीच्या तोंडी लागणार याची भीती सगळ्यांनाच लागली होती, पण मालक अक्षय आणि त्याच्या इतर नावाडी चालक मित्रांनी नावेतून पाण्यात उतरत बैलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, नाव पाण्यात उतरल्यावर बैल आणखी पुढे जाऊ लागला. पाण्यामध्ये मग नावाडी बैल आणि मगर असा थरारक खेळ सुरू झाला होता. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुसऱ्या बाजूला पोहोचलेल्या बैलाला अक्षय व धाडसी नावाडी चालकांनी बाहेर काढले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
