Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Madhav Gadgil Passes Away: भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Madhav Gadgil Passes Away: भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil Passes Away) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.
Madhav Gadgil Passes Away: पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ
डॉ. माधव गाडगीळ हे भारतातील पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रातील एक अत्यंत मान्यवर नाव होते. पश्चिम घाटातील जैवविविधता, निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागावर आधारित विकासाचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला. पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती.
Madhav Gadgil Passes Away: शाश्वत विकासाचे पुरस्कर्ते
पर्यावरण संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल साधण्याची भूमिका त्यांनी आयुष्यभर मांडली. जंगल, नद्या, डोंगररांगा आणि ग्रामसमुदाय यांचा परस्पर संबंध अधोरेखित करत त्यांनी अनेक संशोधन लेख, पुस्तके आणि अभ्यास अहवाल सादर केले. पर्यावरणीय निर्णयांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे ते नेहमी ठामपणे मांडत.
Madhav Gadgil Passes Away: शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदान
डॉ. गाडगीळ यांनी देश-विदेशातील अनेक नामांकित संस्थांमध्ये अध्यापन व संशोधन केले. भारतीय विज्ञान अकादमीसह विविध शैक्षणिक संस्थांशी ते दीर्घकाळ जोडलेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यावरण अभ्यासक आणि संशोधक घडले. डॉ. गाडगीळ यांच्या निधनावर पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. “पर्यावरणासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारा अभ्यासू विचारवंत हरपला,” अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या.
Madhav Gadgil Passes Away: डॉ. माधव गाडगीळ यांचे कार्य व योगदान
डॉ. माधव गाडगीळ यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र तसेच नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापन या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मूलभूत आणि दिशादर्शक संशोधन केले. त्यांच्या अभ्यासामुळे पर्यावरणीय समस्या समजून घेण्यास वैज्ञानिक अधिष्ठान मिळाले. ते भारतीय विज्ञान संस्थेत (IISc) प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अध्यापनासोबतच त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यास, संशोधन आणि संवर्धनाच्या कार्यासाठी प्रेरित केले. आज देशातील अनेक नामवंत पर्यावरण अभ्यासक हे त्यांचे शिष्य आहेत. डॉ. गाडगीळ हे पंतप्रधानांच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. तसेच ‘पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ पॅनेल’ (WGEEP) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक, समतोल आणि दूरदृष्टीपूर्ण धोरण मांडले. त्यांच्या अहवालाने पर्यावरण संरक्षणाबाबत देशभरात गंभीर चर्चा सुरू झाली. पर्यावरण संरक्षण हे केवळ शासनाचे काम नसून लोकसहभागातूनच ते यशस्वी होऊ शकते, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी शेतकरी, आदिवासी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायांशी थेट संवाद साधून पर्यावरणीय जाणीव निर्माण केली.
Madhav Gadgil Passes Away: प्रमुख सन्मान व पुरस्कार
पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले.
- पद्मश्री पुरस्कार (1981)
- पद्मभूषण पुरस्कार (2006)
- शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (1986)
- टाइलर पुरस्कार (2015)
- संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार (2024)
आणखी वाचा























