Sangli : सांगलीत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदाराचा पुत्र भाजपच्या वाटेवर, प्रवेशाची तारीखही ठरली
Arun Lad Son To Join BJP : सांगलीच्या राजकारणातील जयंत पाटील यांचे असलेले वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने मोठी खेळी केल्याची चर्चा आहे.

सांगली : पवारांच्या राष्ट्रवादीला सांगलीत एक मोठा धक्का बसला आहे. पुणे विभाग पदवीधर (Pune Graduate Constituency) आमदार अरुण अण्णा लाड (Arun Lad) यांचे सुपुत्र शरद लाड (Sharad Lad) हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. मंगळवार, 7 ऑक्टोबर रोजी शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची भाजपमधील काही नेत्यांनी दिली. हा प्रवेश झाला तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासाठी मोठा धक्का असेल.
अरुण लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असून ते माजी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांना धक्का देण्यासाठीच भाजपने अरुण लाड यांचा मुलगा शरद लाड यांना गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे.
Sharad Lad To Join BJP : दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होऊन संकेत
विजयादशमी निमित्ताने संभाजी भिडे यांच्या सांगलीतील दुर्गामाता दौडमध्ये शरद लाड यांनी उपस्थिती लावली होती. त्याचवेळी ते भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
Pune Graduate Constituency : पुणे पदवीधरसाठी रस्सीखेच सुरू
पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरुण लाड प्रतिनिधीत्व करतात. सध्या या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसून येतंय. कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणायची असा चंग भाजपने बांधल्याचं दिसतंय. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी सुरू आहे. अशातच आता आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमध्ये जाणार असल्याने या मतदारसंघातील गणित बदलण्याची शक्यता आहे.
शरद लाड यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद लाड यांचा मुंबईत 7 ऑक्टोबर रोजी पक्षप्रवेश होणार आहे.
Jayant Patil Vs BJP : जयंत पाटील- भाजप वाद पेटला
सांगलीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपमधील वाट मोठ्या प्रमाणात पेटला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्यानंतर सांगलीमध्ये झालेल्या सभेतही त्यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्याच कार्यक्रमात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना इशारा दिला. सांगली जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
ही बातमी वाचा :























