Sangli Leopard : बिबट्यांची गँग आता सांगलीत दाखल, पावलांचे ठसे आढळले; नागरिकांना दक्ष राहण्याचे वनविभागाचे आवाहन
Sangli Leopard News : गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असला तरी आजपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. तरीही नागरिकांनी दक्ष राहावं असं आवाहन वन विभागाने केलं आहे.

सांगली : राज्यभरातील अनेक ठिकाणी बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घातला असताना सांगलीही त्यातून सुटलं नाही. शेजारच्या कोल्हापूर नंतर आता सांगलीमध्येही बिबट्याचा वावर असल्याचं दिसून आलं. शहरातील वानलेसवाडी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला. बिबट्याच्या पावलांचे ठशांचे निरीक्षण करुन त्याला वन विभागाने (Forest Department) दुजोरा दिला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दक्ष राहण्याची सूचना वनविभागाने दिली.
सांगली वनविभागातील मिरजमधील कुंभार मळा या ठिकाणी बिबट्याचे ठसे शुक्रवारी दिसून आले होते. सदर ठशांची खात्री झाल्यानंतर वन विभागामार्फत सदर परिसरामध्ये जलद कृतीदल बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात आले होते. तथापि, प्रत्यक्ष बिबट्या दिसून आला नव्हता.
वालनेसवाडी परिसरात भारती हॉस्पिटल समोरील मिरज-सांगली रस्त्यावर सुमारास एक बिबट दिसला अशी माहिती वनविभागाला समजले. वन विभागाचे कर्मचारी तसेच जलद कृतीदल, पोलिस यांच्यामार्फत संयुक्तपणे भारती हॉस्पिटल परिसर वालनेस वाडी परिसर, विजयनगर, हसणी आश्रम, वालचंद कॉलेज परिसर विश्राम बाग या भागात गस्त करत पाहणी केली.
Sangli Leopard News : नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
या पाहणीनंतर या परिसरात बिबट्या असल्याचे नाकारता येत नाही असे पत्रक वन विभागाकडून आता प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असला तरी आजपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. बिबट्याकडून पशूधन अथवा मनुष्यहानी किंवा त्यावरती हल्ला झालेली घटना कुठेही घडलेली नाही. तरी सुद्धा सदर परिसरातील आणि आसपासच्या सर्व नागरिकांना दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
सदर परिसरामध्ये वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावलेले असून वन विभागाचे अधिकारी गस्त घालत संपूर्ण परिस्थितीवर, जलद कृती दल व पोलिसाच्या मदतीने लक्ष ठेवून आहेत.
जतमध्ये प्राणी संग्रहालय होणार
पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले दुसरे सर्वात मोठं प्राणी संग्रहालय जत तालुक्यात होणार असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. त्यामध्ये जवळपास 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी असतील. तसेच बिबट्यांची देखील जत तालुक्यातील या प्राणी संग्रहालयात राहण्याची सोय करू असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
जवळपास 100 एकरांमध्ये 150 कोटीचा या प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव असणार आहे. राज्य सरकारची या प्राणी संग्रहालयाला मान्यता मिळालेली असून आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू आणि पुढच्या दोन-तीन महिन्यामध्ये मंजूर करून घेऊ असा विश्वासही पडळकर यांनी बोलून दाखवला.
ही बातमी वाचा:
























