Sangli Crime: सांगलीत लाचखोरांची मालिका कायम; आता अग्निशमन विभागाचा प्रमुख सव्वा लाखाची लाच घेताना जाळ्यात
Sangli Crime : तक्रारदाराने अग्निशमन विभागाकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. दाखला देण्याच्या बदल्यात पवार यांनी त्याच्याकडे सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
Sangli Crime: ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सव्वा लाखांची लाच घेताना सांगली (Sangli News) मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभारी अग्निशमन अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय आनंदराव पवार (वय 50 वर्षे) असे लाच घेणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराने अग्निशमन विभागाकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. दाखला देण्याच्या बदल्यात पवार यांनी त्याच्याकडे सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता त्यामध्ये पवारने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सायंकाळी तक्रारदाराकडून सव्वा लाख रूपयांची लाच स्वीकारताना पवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत पवार यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मागर्दशर्नाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, प्रीतम चौगुले, ऋषिकेश बडणीकर, अजित पाटील, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सीमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
तलाठी संघटनेचा अध्यक्ष बाळासाहेब जगताप दुसऱ्यांदा लाच घेताना सापडला
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वीच सांगलीतील जत तालुक्यातील करजगी येथील वादग्रस्त तलाठी लाचखोर असूनही जत तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष म्हणून थाटात मिरवणारा बाळासाहेब शंकर जगतापला 50 हजारांची लाच घेताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला घरातच रंगेहाथ पकडले होते. घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने त्याने तक्रारदाराला घरीच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते. घरात सुवासिनींचा धार्मिक कार्यक्रम सुरु असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळासाहेबला सापळा रचत पकडले. लाचखोर जगतापने आपल्या तिल्याळ गावी शेततळे बांधलं आहे. या तळ्याचे पूजन आणि सुवासिनींसाठी प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पाहुणे मंडळी सुद्धा आली होती. त्यांच्यासमोरच जगताप लाचलुचपतने रंगेहाथ पकडून उचलले होते.
लाचखोर जगताप हा दुसऱ्यांदा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. 7 जुलै 2014 रोजी तक्रारदाराच्या खरेदी दस्ताची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजार लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी मिरज शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.