Rohit Pawar on Gopichand Padalkar : चंद्रकांतदादा तुम्ही भाजपचं सोनं आहात, सांगलीतील बेन्टेक्स खालच्या थरावर बोलत आहे, खऱ्या सोन्यांनी दखल घेण्याची गरज; रोहित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल
Rohit Pawar on Gopichand Padalkar : या बेन्टेक्सच्या सोन्याचे काय करायचे हे भाजपच्या खऱ्या सोन्याने लक्षात घेतले पाहिजे, असे म्हणत रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे

Rohit Pawar on Gopichand Padalkar : चंद्रकांतदादा तुम्ही सोनं आहात. पण आताच्या काळात काही बेन्टेक्सचे लोक या जिल्ह्यात फिरत आहेत. खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबाबत टीका करत आहेत. त्यामुळे या बेन्टेक्सच्या सोन्याचे काय करायचे हे भाजपच्या खऱ्या सोन्याने लक्षात घेतले पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यातून ते बोलत होते.
रोहित पवार म्हणाले की, अनेक दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर अनेक राजकारणातले मोठे मोठे खेळाडू या व्यासपीठावर बसलेले आहेत. अजितदादांच्या बाबतीत बोलायचे आणि बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचे झाले तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत. फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडची काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते.
चंद्रकांत दादा पाटील कधी बॅटिंग करतात, कधी बॉलिंग करतात. पण मिडीयम पेस बॉलर आहे.ते चांगली बॉलिंग टाकत असतात. जयंत पाटील हे कधी ऑफ स्पिन टाकतात, तर कधी लेग स्पिन टाकतात तर कधी गुगली टाकतात. कधी कधी बॉल हातातच असतो. पण आम्हाला बॅट्समनला असे वाटते की, त्यांनी बॉलिंग सुद्धा टाकली, असे दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत. तसेच या व्यासपीठावर आमच्यासारखे नवखे खेळाडू, वयाने कमी, बॅट हातात, इतके मोठे खेळाडू आपल्याला बॉलिंग टाकत आहेत. जमेल तसा बॉल मारण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी तुफान फटकेबाजी त्यांनी यावेळी केली.
रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
रोहित पवार पुढे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी अधिवेशनात मी भाषण केले. अनेक लोकांनी सांगितले की, चांगले भाषण झाले. मग मला अजितदादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही पार्टी म्हणून एकत्रित होतो. त्यांनी मला घरी बोलावून घेतले. माझी अपेक्षा होती की, त्यांनी मला सांगावे भाषण चांगले झाले, अजून चांगले कर. त्यांनी सांगितले की, भाषण चांगले झाले पण एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो की, अरे भाषण देत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो. ते जरा शर्टचे बटण वगैरे वरपर्यंत लावत जा. इतक्या बारकाईने माझ्यावर लक्ष होतं आता ते गावकीचा विचार करता आणि भावकीचा कुठेतरी विसरले आहेत. कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी विचार करावा, असा टोला त्यांनी यावेळी अजित पवारांना लगावला.
रोहित पवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका
सांगली जिल्ह्यात संस्कृतीला फार महत्व दिले जाते. चंद्रकांत दादा पाटील येथे आहेत. दादा आत्ताच्या काळात काही लोक आहेत. तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचे खऱ्या अर्थाने सोनं आहात. अनेक वर्ष त्या पक्षात तुम्ही राहिलेले आहात. आम्ही जेव्हा पण तुम्हाला भेटतो तुम्ही आमचे ऐकून घेतात. एखाद्या मुलाचा किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न असला तर लगेच तुम्ही तिथे फोन लावता आणि ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते. तुम्ही म्हणजे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण आहात. दादा तुम्ही सोनं आहात. पण आताच्या काळात काही बेन्टेक्सचे लोक या जिल्ह्यात फिरत आहेत. खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबाबत टीका करत आहेत. त्यामुळे या बेन्टेक्सच्या सोन्याचे काय करायचे हे भाजपच्या खऱ्या सोन्याने लक्षात घेतले पाहिजे, असे म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
आणखी वाचा






















