(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचे 36 तास सुरु असलेले काटा बंद आंदोलन मागे
स्वाभिमानीच्या मागणीप्रमाणे दर देण्याचे दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
सांगली : सांगलीत (Sangli News) दोन दिवसांपासून ऊस दरासाठी (Sugarcane) सुरु असलेलं स्वाभिमानीचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. आंदोलन मागे घेतल्याचे राजू शेट्टींनी (Raju Shetti) जाहीर केलं आहे. स्वाभिमानीच्या मागणीप्रमाणे दर देण्याचे दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखानाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. राजू शेट्टींनी 36 तासांनंतर आंदोलन मागे घेतले आहे.
सांगलीमधील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचं मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे 36 तासांपासून वसंतदादा साखर कारखान्यासमोर सुरु असलेले ठिय्या आंदोलन राजू शेट्टी यांनी मागे घेतले आहे. एफआरपी अधिक 100 रुपये आणि गत हंगामातील 50 व 100 रुपये थकीत देणे द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या दिवसांपासून सांगली जिल्ह्यात आंदोलन सुरु झाल्यावर बैठकाही झाल्या होत्य. मात्र त्या निष्फळ ठरल्या होत्या. त्यामुळे स्वाभिमानीकडून गेल्या दोन दिवसांपासून सांगलीतल्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यासमोर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काटा बंद आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही,अशी भूमिका जाहीर करण्यात आली होती. तर आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप देखील बंद झालं होतं.
अजित पवारांसोबत बैठक निष्फळ
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. मात्र ही बैठक देखील निष्फळ ठरली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला आणि साखर कारखानदारांना आंदोलन तीव्र करण्याचा गर्भित इशारा देत, वसंतदादा साखर कारखान्यासमोरील आंदोलन सुरूच ठेवलं होतं. यामुळे अखेर दत्त इंडियाकडून दर देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दत्त इंडियाकडून मिळालेल्या पत्राच्या अनुसरून स्वाभिमानीच्या मागणी पेक्षा अधिक दर देण्याचं मान्य करत असल्याचं लेखी पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले.यामुळे राजू शेट्टींनी वसंतदादा कारखान्यासमोर सुरू असलेला काटा बंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करत इतर उर्वरित 15 कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील,असे स्पष्ट केले आहे.तर आता या पुढील आंदोलन हे शिराळा तालुक्यातल्या दालमिया साखर कारखान्यावर असणार असल्याचेही जाहीर करत सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दर देण्यामध्ये आडकाठी असणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांच्या कारखान्या बाबतीतही लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल,असेही स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा :