Prakash Shendge : आगामी विधानसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी होणार, ती आम्हीच जिंकणार : प्रकाश शेंडगे
Maratha Reservation : सध्याच्या राजकीय चळवळीमधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 10 ते 15 ओबीसी नेतृत्व समोर येत आहे, प्रत्येकजण म्हणतोय मी लढणार असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले.
सांगली : येणारी विधानसभा निवडणूक ही ओबीसी विरुद्ध मराठा (OBC Vs Maratha) अशीच होणार आहे, त्यात ओबीसी नेते आणि कार्यकर्ते जिंकल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ते बोलत होते.
प्रकाश शेंडगे म्हणाले की, आता जी राजकीय चळवळ उभी राहणार आहे त्यातून नवे नेतृत्व समोर येणार आहे. प्रत्येकजण म्हणतोय मी लढणार. आतापर्यंत कुणीच लढायला तयार नव्हतं. या वातावरणात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 10-15 ओबीसी नेते तयार होणार आहेत. त्यामुळे आगामी राजकीय लढा जो आहे तो ओबीसी विरूद्ध मराठा असाच होणार आहे. हा लढा ओबीसीचे नेते आणि कार्यकर्ते जिंकल्याशिवाय राहणार नाहीत.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगलीमध्ये लवकरच ओबीसींचा मोठा मेळावा घेण्यात येईल आणि या मेळाव्यात पुढील भूमिका ठरविण्यात येईल असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
विधानसभेला ओबीसी उमेदवार देणार
या आधी प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर सर्व 288 मतदारसंघातून उमेदवार उभे करणार असं जरांगे म्हणाले होते. त्यावर बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले होते की, जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभा राहतील, आमचं बहुमत आहे. 60 टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही 80 टक्के जातो. आमचेही 199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाले असून आम्हीही तशीच भूमिका घेऊ शकतो.
आर्थिक मागास प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण मिळत असून त्याचा लाभही मराठा समाजाला होत आहे. या मधील 10 टक्क्यांपैकी साडे आठ टक्के आरक्षण हे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतलं आहे असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
गरिबी हटवण्याचा कार्यक्रम जर राबवायचा असेल तर जरांगे यांनी सरकारकडे तशी वेगळी मागणी करावी, वेगवेगळ्या माध्यमाद्वारे, योजनांद्वारे ही गरिबी हटवली जाऊ शकते असं प्रकाश शेंडगे म्हणाले. ते म्हणाले की,ओबीसीतून आरक्षणाची मागणी ही जरांगे यांनी केली आहे. ते मिळालं नाही तर जरांगे निवडणूक लढवणार आहेत. त्यावर आम्हाला कुणाला आव्हान द्यायचं नाही. ओबीसीमधील ज्या काही 375 जाती आहेत, त्या अत्यंत मागासलेल्या आहेत. ते आरक्षण जरांगे यांना काढून घ्यायचं आहे. मराठा समाजाला आम्ही आमचा मोठा भाऊ मानतो. पण गरीब समाजातील आरक्षण काढून घेतलं तर हा समाज गप्प कसा बसेल? मराठा समाजाला गरिबी आली असं म्हटलं जातंय, पण ही गरिबी त्यांच्यावर कोण आणली? त्यांच्याकडेच सर्व सत्ता, बँका आहेत. आरक्षण हा विषय गरिबी हटवण्याचा नाही, तो सामाजिक आहे.
ही बातमी वाचा :