Battis Shirala Nag Panchami : न्यायालयाचे आदेश पाळूनच शिराळामध्ये नागपंचमीचा उत्साह
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आणि निर्बधानंतर नागपंचमी सण साजरा होत आहे.हा सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Battis Shirala Nag Panchami : कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आणि निर्बधानंतर नागपंचमी सण साजरा होत आहे.हा सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. दरम्यान, पूर्वापार म्हणजे जिवंत नागाची पूजा करत सुरू असलेल्या शिराळ्याच्या ऐतिहासिक अशा नागपंचमीला परवानगी द्या आणि नागाला वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी नुकतीच संसदेत केली होती.
याबाबत सुब्रमण्यम समितीने भारतीय सण, उत्सव, परंपरा यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सुचवलं आहे, असे माने यांनी म्हंटले असलं, तरी जिवंत नागाची पूजा करावी असा निर्णय अजून दिला गेलेला नाही.त्यामुळे यंदाही न्यायालयाचे आदेश पाळूनच शिराळाकराना नागपंचमी साजरी करावी लागणार आहे.
जगप्रसिद्ध असणारी शिराळ्याची नागपंचमी कोरोनामुळे मागील दोन वर्षाच्या बऱ्याच निर्बधानंतर यंदा मुक्तपणे आणि न्यायालयाच्या नियमानुसार उत्साहात साजरी करण्यात येते. न्यायालयाचे संपूर्ण आदेश पाळून ही नागपंचमी साजरी होत आहे.घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करून शिराळाकरांना यंदाही साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करत आहे, तर प्रशासनाकडून नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
सांगली जिल्ह्यातील शिराळा हे जिवंत नागांच्या पूजेची परंपरा होती.मात्र 2002 पासून न्यायालयाच्या आदेशानंतर शिराळा येथे साध्या पद्धतीने नागपूजा करण्यात येत आहे. घरोघरी महिलांकडून प्रतिकात्मक मातीच्या नागांची पूजा करण्यात येते.कोरोना कालावधीनंतर नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.हा सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच नागपंचमी सणाचे आयोजन होईल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेत.
नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने 125 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये 10 गस्ती पथके तयार केली असून या पथकात 8 जणांची नियुक्ती केली आहे. तसेच 7 तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. शिराळा नगरपंचायतीतील 32 गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष राहणार आहे.आरोग्य विभागाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.तसेच अत्यावश्यक बाबींसाठी उपजिल्हा रूग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्ययावत ठेवण्यात आली आहे.
पोलिस विभागाच्या माध्यमातून 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये एक पोलिस उपअधीक्षक, 14 पोलिस निरीक्षक, 35 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 60 महिला अंमलदार, 44 वाहतूक शाखेतील कर्मचारी तर 330 पुरूष अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आलीय.नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून 16 व्हिडिओ कॅमेराव्दारे चित्रीकरण करण्यात येत असून ध्वनी मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 12 ध्वनीमापक यंत्रे तैनात ठेवण्यात आलीत. त्याचबरोबर शहरातील वाहतूकीचेही नियोजन करण्यात आलं आहे.