Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; इस्लामपूर सत्र न्यायालयाचा आदेश रद्द
Raj Thackeray : अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करत दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जावर पुन्हा नव्यानं सुनावणी घेण्याचे इस्लामपूर सत्र न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करत दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जावर पुन्हा नव्यानं सुनावणी घेण्याचे इस्लामपूर सत्र न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी राज ठाकरे यांनी 2013 मध्ये अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 27 ऑक्टोबर 2021 रोजी फेटाळला होता. त्यानंतर राज यांनी 11 जुलै 2022 रोजी पुन्हा नव्यानं केलेला अर्जही 15 ऑक्टोबर रोजी फेटाळण्यात आला. त्याविरोधात राज यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयात केलेली याचिकाही 3 फेब्रुवारी 2023 रोजी फेटाळत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. सांगलीमधील आंदोलनाला आपण चिथावणी दिली यात तथ्य नाही, घटनेवेळी आपण अटकेत होतो, त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा दावा राज यांनी याचिकेतून केला होता.
काय आहे प्रकरण?
राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला होता. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे 2008 मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. ज्यामध्ये दगडफेकही झाली होती. सरकार पक्षाकडून याप्रकरणी राज ठाकरे, मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत व अन्य यांच्याविरुध्द कोकरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिराळा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ठाकरे यांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्याची विनंती वकिलामार्फत इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली होती. सरकारी वकिल राजेश पाटील यांनी युक्तीवाद करीत असताना अद्याप साक्षीदारांचे जबाब नोंदविले नाहीत, असे सांगत दोषमुक्तीला विरोध दर्शवला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ठाकरे यांची दोषमुक्त करण्याची विनंती अमान्य केली.
आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल
2008 साली भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून राज्यभर मनसेने आंदोलन केलं होतं. याबद्दल कल्याणमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभर मनसेकडून ठिकाणी आंदोलन करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बंद पुकारला होता. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडणे आणि आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिरीष पारकर, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत सहित दहा जणांच्या वर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांतता भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या