Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भाषणात कुपवाडमधील मशीद बांधकामाचा मुद्दा उपस्थित; प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Sangli News : कुपवाडमधील त्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी मशिदीला विरोध केला होता. त्यानंतर या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत माहीम आणि सांगलीमधील कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे कुपवाड भागातील त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजय नगर पोलिस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.
जागेवरून वादाची ठिणगी
सदरच्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी मशिदीला विरोध केला होता. त्यानंतर या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. मशीदचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात येत असून कोणतीही परवानगी नाही. त्या ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.
दोन्ही गटाकडून फिर्यादी दाखल
दरम्यान, या प्रकरणानंतर संजयनगर पोलिस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 15 जणांवर गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सध्या याठिकाणी शांततापूर्ण वातावरण असल्याचे संजय नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
कुपवाडमधील तो नेमका वाद काय?
मस्जिदच्या दाव्याबाबत सुरू असलेल्या रस्त्यावरील मंगलमूर्ती कॉलनीत दोन गटात जोरदार मारामारी झाली होती. यामध्ये सहाजण जखमी झाले होते. रामचंद्र यशवंत कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यासीन कान नदाफ, शकील चौधरी, साकीय रफीक चौधरी, इरफान नदाफ, अस्लम गुजावर, मोहसीन मुजावर, आयेशा चौधरी, सायरा चौधरी, अंजुम चौधरी, शकील चौधरी व रफीक चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाकडून यासीन इकबाल नदाफ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामचंद्र कोष्टी, श्रीकांत रामचंद्र कोष्टी, सुनीता रामचंद्र कोष्टी, स्वप्नाली श्रीकांत कोष्टी, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दोन्ही गटांतील यासीन नदाफ, हुजेफ नदाफ, साकीत चौधरी, रामचंद्र कोष्टी, श्रीकांत कोष्टी व सुनीता कोष्टी हे जखमी झाले आहेत. या वादाचा न्यायालयात दावा सुरु आहे. दोन्ही गट एकमेकांच्या शेजारी राहतात.
इतर महत्वाच्या बातम्या :