Sadabhau Khot: एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, देवेंद्र फडणवीस म्हणजे अर्जुन, शरद पवार हे शकुनी मामा: सदाभाऊ खोत
Maharashtra Politics: सदाभाऊ खोत म्हणतात, महाराष्ट्रच्या राजकारणातील कर्ण एकनाथ शिंदे तर अर्जुन देवेंद्र फडणवीस. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिले आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घालवल्याचा ही सदाभाऊ खोत यांचा आरोप
सांगली: विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत केलेले एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण आणि देवेंद्र फडणवीस हे अर्जून असल्याचे म्हटले आहे. तर शरद पवार हे शकुनी मामा असल्याचा दावा सदाभाऊंनी (Sadabhau Khot) केला आहे. ते रविवारी भाजप नेते सम्राट महाडिक (Samrat Mahadik) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) प्रचारासाठी सांगलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या राजकीय टिप्पणीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण हे एकनाथ शिंदे तर अर्जुनाची भूमिका देवेंद्र फडणवीस बजावत आहेत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिले आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घालवले, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मविआचे सरकार पाडून महायुतीचे पुन्हा सरकार आणले. राज्य कसे चालवावे याचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरले आहे. कारण फडणवीसच आपल्याला फाइट देऊ शकतात हे शरद पवारांना कळले आहे. त्यामुळे वेगवेगळी आंदोलने आतापर्यंत राज्यात उभी करण्यात आल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनीमामा; सदाभाऊ खोत यांची टीका
मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. पण यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. पण 2019 साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आरक्षण मिळवून दिले. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवले. मात्र, या दोघांवर टीका झाली नाही , टीका झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर. कारण प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.
सदाभाऊ खोत यांना शरद पवार गटाचा धक्का
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का दिला होता. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला होता. भानुदास शिंदे गेल्या 25 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत, अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्याचबरोबर त्यांनी ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. शेतकरी चळवळीतील नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या संघटनेत त्यांनी कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश विधानसभा निवडणुकीपूर्वी रयत क्रांती आणि सदाभाऊ खोत यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
आणखी वाचा