Sangli News : शहीद नायब सुभेदार जयसिंग भगत अनंतात विलीन; खानापुरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
सांगली जिल्ह्यातील खानापूरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर भगत यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. खानापुरात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sangli News : सांगली जिल्ह्यातील खानापूरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर भगत (वय 39 वर्षे) यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. खानापुरात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सियाचीन बॉर्डरवर कर्तव्यावर असताना हिमस्खलनात गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्यांना प्राणज्योत मालवली. शहीद जयसिंग भगत यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. दुर्दैवाचा फेरा म्हणजे दीड वर्षापूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. गावातील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत.
अंत्ययात्रेला ग्रामस्थांची प्रचंड गर्दी
दरम्यान, शहीद भगत यांचे पार्थिव आज पहाटे लष्कराच्या विशेष विमानाने लडाखहून पुण्यात पर्थिव पोहोचले. त्यानंतर सकाळी लष्कराच्या वाहनातून शहीद भगत यांचे पार्थिव त्यांच्या खानापूर या मूळगावी पोहोचले. शहीद जयसिंग भगत यांच्या अंत्ययात्रा खानापुरातून काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे, अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. अंत्ययात्रेत शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा लाईफ इन्फन्ट्रीकडून मानवंदना
मराठा लाईफ इन्फन्ट्रीकडून शहीद जयसिंग भगत यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष डॉ. उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ दयानिधी राजा, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनीही पुष्पचक्र अर्पण केले.
सियाचीनमध्ये गंभीर जखमी अन् उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
शहीद जयसिंग भगत 2003 मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. शहीद जयसिंग भगत हे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. ते लेह लडाख भागात ग्लेशियर सियाचीन बॉर्डरवर तैनात होते. 14 आणि 15 जानेवारी दरम्यान मोठी बर्फवृष्टी आणि हिमस्खलन झाले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी चंदीगड येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी (20 जानेवारी) सकाळी उपचार सुरु असताना यांची प्राणज्योत मालवली. भारतीय लष्कराने बॅटल कॅज्युलिटी अर्थात युद्धभूमीवर जखमी झाल्यामुळे आणि त्यातून मृत्यू झाल्याने जयसिंग भगत यांना शहीद घोषित केले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
