Jayant Patil : कंत्राटी नोकर भरतीने आरक्षणाचा प्रश्न बाजूला, कंत्राटी भरतीसाठी 9 एजन्सी नियुक्त; जयंत पाटलांची जोरदार टीका
राज्य सरकार कंत्राटी नोकरांनी चालवण्याची सत्ताधारी सरकारची मानसिकता आहे. कंत्राटी भरतीसाठी सरकारकडून 9 एजन्सी नियुक्त करण्यात आल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला.
सांगली : शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरती विरोधात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी आज राज्य सरकारच्या कंत्राटी भरती मानसिकतेवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्य सरकार कंत्राटी नोकरांनी चालवण्याची सत्ताधारी सरकारची मानसिकता आहे. या राज्यात बेकारीचा प्रश्न मोठा असताना कंत्राटी कर्मचारी किती जबाबदारी काम करतील? हा प्रश्न आहे.
कंत्राटी नोकर भरतीने आरक्षणाचा प्रश्न बाजूला जाईल. कंत्राटी भरतीसाठी सरकारकडून 9 एजन्सी नियुक्त करण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, राज्यात नोकर भरती, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, आरक्षण असे वेगवेगळे मुद्दे असताना जाणीवपूर्वक वेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत.
मोदी आहे तर जगात काही शक्य आहे
दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी खोचक शब्दामध्ये टीका केली. ते म्हणाले की, मोदी आहे तर जगात काही शक्य आहे. चंद्रकांत पाटील जर मोदी, नवीन युनो तयार करू असं म्हणत असतील तर त्यांचा विश्वास खरा ठरो, पण युनो तयार करण्याचा कालावधी ठरला पाहिजे. लोकसभा निवडणुकीआधी केल्यास बरं होईल अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटलांना उपरोधिक टोला लागावला.
सूत्र करणार कोण आहे हे आपल्याला माहित नाही
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून याचा बोलविता धनी शरद पवार गटातील नेता असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील मजकूर आपण सोशल मीडियातून पाहिला. त्याच्यामागे सूत्र करणार कोण आहे हे आपल्याला माहित नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
सभेत राज्य सरकारचा निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक?
दरम्यान, आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या झालेल्या विक्रमी सभेवेळी गावामध्ये वीज आणि इंटरनेट खंडित होण्याचा प्रयत्न झाला होता, यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या सभेदरम्यान आसपासच्या गावामध्ये वीज आणि इंटरनेट खंडित करण्याचा प्रकार झाला तो राज्य सरकारचा निष्काळजीपणा होता की जाणीवपूर्वक होता? अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली.
इतर महत्वाच्या बातम्या